वास्तव्य:

मुंबई, अमेरिका, नाशिक

भ्रमणध्वनी:

+91 9869043016

इमेल:

yotiambekar@gmail.com

Published

03/03/2024

No Comments

Join the Conversation

एकता कपूर कधी आमच्या घरी आली तर भलतीच खट्टू होईल. आमच्या घरी सास-बहू प्रोब्लेम मुळी नाहीच! मुंबईत आमचं घर सरकारी नियमाशी इमान राखत तिघांचंच असलं, तरी नांदेडला माझ्या सासरच्या घरी चांगलं पंधरा-वीस माणसांचं एकत्र कुटुंब आहे. तिथं ‘चार दिवस सासूचे-सुनेचे’ असला ‘ड्रामा’ नसला, तरी नाट्य मात्र जरूर आहे. तिथं कधी ज्योती आंबेकर आपल्या सासूबाईंच्या मांडीवर डोकं ठेवून आरामात पहुडली आहे, तर कधी तिच्या सासूबाई तिची वेणी घालताआहेत, असली सुरस आणि चमत्कारिक वाटावीत अशी दृश्य वास्तवात घडताना दिसतील. आणखी स्फोटक बातमी सांगू? मी माझ्या सासूबाईंना चक्क एकेरीच हाक मारते – ए आई ! (माझ्या मिस्टरांनी हे ऐतिहासिक दृश्य मोबाइलमध्ये ‘स्क्रीन सेव्हर’ म्हणून जतन केलेलं आहे.)

माई अंबेकर या कायद्यानं माझ्या मदर-इन-लॉ आहेत; पण खरं तर माझ्या मिस्टरांनइतक्याच माझ्याही आई आहेत. आणि माझ्या आईशी माझं जितकं जमतं, तितकंच-किंबहुना काकणभर जास्तच माईशी माझं गूळपीठ आहे. त्याचं एक कारण हे असावं की, मी जे सांगते ते माईला पटतं. तिला त्याबद्दल काही शंका नसतात. तिला म्हटलं, ‘या दोन साड्या आणल्यायत ना, त्यांतील एक बाहेर जायला ठेव बरं का! आणि ती नेसलीस ना, तर पुन्हा नेसण्यापुर्वी इस्त्री करून नीट ठेव हं.’ तर पुन्हा मी नांदेडला जाते तेव्हा मला ती साडी कपाटात छानइस्त्री करून ठेवलेली दिसते. आमच्या कायदेशीर माँसाहेब मात्र पक्क्या स्वतंत्र बाण्याच्या आहेत. ती कधीच बदलणार नाही. ती तिच्या मतानंच वागणार.

मला वाटतं, प्रत्येक माणसाला दुसऱ्याला ‘मोल्ड’ करायची स्वाभाविक आवड असते. मुलं नाही का, बारा-पंधरा वर्षाची झाली की आई-वडिलांना सांगायला लागत की, बाहेर जाताना हे नाही, ते घाला….. आता हा कट् जुना झाला पपा…. वेगैरे वेगैरे. मी हि आवड माईवर पुरेपूर भागवून घेते.

नुसत्या कपड्यालत्यांच्या बाबतीतच नाही, तर वागण्याबोलण्याबाबतही मी तिला भारंभार सूचना करते. प्रथमदर्शनी ते पाहणाऱ्याला हा काहीसा अजब प्रकार वाटेल. पण मला माहित आहे- माझ्या माईला सांगणं गैर वाटत नाही. माझा हेतू तिला कळतो. ती मनानं अशी निखळ, निर्मळ आहे, की जे सांगावं ते ती ऐकून घेतेच; वर म्हणते, ‘बरं केलस सांगितलंस. माझ्या नव्हतं लक्षात आलं.’

माईचे आणि माझे सूर बघताचक्षणी जुळले. त्याचं कारण म्हणजे आमचा दोघींचा बोलघेवडेपणा! अंबेकर घराण्यात पुरुष मंडळी ‘हो’ किवा ‘नाही’ या दोनच शब्दांत बोलतात. मितभाषीपणा हि जणू त्यांची कुलपरंपरा आहे. नांदेडच्या आमच्या घरात आवाज ऐकू येतो तो बायकांचा! आणि तोही अशासाठी की, घरातल्या सुना वेगवेगळ्या घरांमधून आलेल्या आहेत. मला आणि माईला तर एकसारखं बोलायला लागतं. त्यामुळेच आमच्यात नात्यापलीकडचं एक नातं जुळून गेलं आणि ते घट्ट होत गेलं. आम्ही बरोबर असतो तेव्हा एकमेकिंना विचारूनच साड्य नेसतो. लहान-मोठ्या बरोबर जातो. जोरदार हसण्यात एकमेकींच तोंड फक्त आम्ही दिघीच धरू शकू. बरोबर असतो तेव्हा आमचं तोंड फक्त झोप लागल्यावरच बंद होतं मी दिवसभर काय करते; कार्यक्रमाला गेले होते तिथं काय झालं; टीव्हीवर ती अमुकतमुक पाहुणी मुलाखतीसाठी आली होती तेव्हा काय झालं….. सगळं तिला जाणून घ्यायचं असतं. मी मराठवाड्यात असते तेव्हा माझ्या सगळ्या कार्यक्रमांना माझ्या आईप्रमाणेच माझी माईदेखील हजार असते. खुपदा कार्यक्रम लांबतात. घरी यायला, जेवायला-खायला अवेळ होतो. पण माईच्या चेहऱ्यावरचं हसू कायम असत. एका क्षणासाठीही त्या हास्याच्या जागी आठी दिसत नाही. माईच्या मनाचा हा ताजेपणा मला खूप आवडतो. तिला सगळ्या गोष्टींबद्दल कुतूहल असतं. सगळीकडे हिंडायचं असतं. मराठवाड्यात असो की मुंबईत, ती दोन्हीकडे मजेत असते. मुंबईतल्या गर्दीनं, झुळझुळीतपणानं ती कधी दबून जात नाही.

आम्हाला एकत्र राहायला मिळत नाही, ( आणि कदाचित हेच आमच्या नात्यातला गोडवा, त्यातील ओढ टिकण्याच कारण असावं !) पण आम्ही टेलिफोन सेवा पुरेपूर राबवत संपर्कात असतो. काही दुखलंखपलं, मनाला लागलं तर माई लगेच माझा नंबर फिरवते. मी खरं म्हणजे नेहमीच तिची बाजू घेते असंही नाही. तिचं बोलणं ऐकून घेतल्यावर मला जर वाटलं की, त्या घटनेबद्दलचा तिचा दृष्टीकोन चुकीचा आहे, तर तसं मी स्पष्ट सांगते. अर्थात तिला न दुखवता. पण माईही कधी मला अडवत नाही. नेहमीप्रमाणे माझं बोलणं तिला पटतं. अशा वेळी मला ती एक लहान मुलगी वाटते…तिच्या नातीपेक्षाही लहान आणि निर्व्याज, निरागस.

दुसऱ्याबद्दल काळजी असणं हा हि माईचा स्थायीभाव आहे. ओळख एका क्षणाची का असेना, माई समोरच्या माणसाबद्दल काळजी करू लागते. एकदा मी माझ्या एका मैत्रिणीला घेऊन नांदेडला गेले. माईनं चिरपरिचित अघळपघळरित्या तिचं स्वागत केलं. मग लगेच तिची काळजीयुक्त चौकशी सुरु झाली. मुलांची काय व्यवस्था केली, नवऱ्याच्या जेवणखाण्याचं काय, वेगैरे वेगैरे.

येणाऱ्या-जाणाऱ्याचं असं स्वागत करताना कधी कधी गमतीदार प्रसंग घडतात. ‘अतिथी देवो भव’ मानणाऱ्या माईला कळतं की, ज्योतीच्या मैत्रिणीला करडईची भाजी फारशी आवडत नाही. पण एव्हाना भाजी शिजायला पडलेली असते. पण आतिथ्यशील माईला या गोष्टीची पर्वा नसते. ती म्हणते ‘बाई, तुला वांगी चालतील का? आत्ता घेऊन येते.’ या क्षणी मला मध्ये पडून ‘व्हेटो’ वापरावा लागतो. कारण आम्ही बाहेर जायला निघालो असतो, किंवा मुंबईला परत जाणार असतो. यापुढे भाजी आणायची कधी आणि ती होणार कधी अस यक्षप्रश्न मला पडलेला असतो. माईच्या हातात असतं तर पाहुणीला वांग्याची भाजी खाऊ घालून पाठवण्यासाठी गाडीची साखळी खेचून ती गाडीही थांबून ठेवली ! गाडीचं टाइमटेबल गेलं चुलीत ! (अक्षरशः!)

पण खरं सांगायचं तर गाडीच्या किंवा आमच्या टाइम टेबलपेक्षा मला माईच्या स्वयंपाकाची काळजी- नव्हे भीती असते. टाइम टेबलप्रमाणेच स्वयंपाकाचं आणि माईचं फारसं सख्य नाही. माईनं एखादा पदार्थ करण्याची घोषणा केली की तिची जाऊ, सासू किंवा सून यांच्यापैकी जी मोकळी असेल ती लगेचच पुढे होते आणि माईला रस्ता रोको करते- ‘माई, हा जिन्नस करूया. पण तुम्ही नको!’ अस म्हणून तिच्या हातातला तो जिन्नस काढून घेऊनच ती थांबते. माईही तितक्याच शांतपणे, समजूतदारपणे माघार घेते. तिच्या चेहऱ्यावर राग वा विषादाचा लवलेशही नसतो. तिच्या चेहऱ्यावरच्या प्रसन्नतेतला एक अंशही कमी झालेला नसतो.

तिचं शुद्ध, निर्व्याज मन हि तिची लाखमोलाची गुणवत्ता आहे. आजच्या काळात हा गुण दुर्मिळ आहे. आणि कदाचित निरुपयोगीसुद्धा ! पण ज्याच्या वाट्याला तो येतो, त्याला त्याचं मोल नक्कीच कळेल. माई म्हणजे आपल्याला अपरिचित असलेल्या अन् आता लोप पावत चाललेल्या गावाकडच्या संकृतीचं नमुनेदार उदाहरण आहे. तिला वेळेचं भान राहत नाही किंवा तिला स्वयंपाक तीतकासा जमत नाही, हा तिचा दोष नाही. एका विशिष्ट काळशी संबंधित जीवनशैलीचा तो परिपाक आहे. नांदेडमधल्या एका छोट्या गावात साठ वर्षापूर्वी ती अंबेकरांची सून म्हणून आली. त्या काळातल्या स्त्रियांप्रमाणे तिच्या घरात लागोपाठ पाळणा हलत राहिला. एकत्र कुटुंबपद्धतीमुळे घरात पोक्त वयाच्या पुष्कळ स्त्रिया होत्या. स्वयंपाकघराची मुख्य जबाबदारी त्यांच्याकडेच होती. नोकरीबिकरीचा प्रश्नच नव्हता. घरातल्या पुरुष माणसांच्या जेवणाच्या वेळा सांभाळायच्या, हाच काय तो घड्याळाशी संबंध ! हि जबाबदारीही विभागून सांभाळायची. कामाचा उरक व कौशल्य यांचा संबंध काय? एकत्र कुटुंबपद्धतीत माईसारख्या कितीतरी स्त्रिया आढळतील. त्यांच्या अति बोलण्यामागे अन् चौकश्यांमागे हेच कारण असतं. बाहेरच्या जगाशी त्यांचा संबंध फक्त घरी येणाऱ्या माणसांमार्फत असतो. आता तरी वेळ घालवायला टीव्ही आहे, पण तीस-चाळीस वर्षापूर्वी एकमेकींशी गप्पा मारणं, हाच त्या काळातल्या बायकांना ‘चेंज’, विरंगुळा आणि तीची करमणूक असे.

मात्र, माईचा समंजसपणा तिला न मिळालेल्या शिक्षणातून, छोट्या गावातल्या वास्तव्यातून किंवा तिच्या काळातल्या असमंजस सामाजिक वातावरणातून आलेला नाही. माईच्या मनात त्याबद्दल कोणत्याही प्रकारचा गंड नाही. ती समाजातल्या कोणत्याही थरांत सहजपणे मिसळू शकते. माझ्याबरोबर सार्वजनिक सभा-समारंभांना ती येते आणि माझ्या वरिष्ठांशीसुद्धा सहजपणे वागते. मी काही कार्यक्रमाकरिता आले असेन आणि थोडावेळ तिच्याबरोबर नसेन, तरी ती मला अचूक शोधून काढते. माझी गाडी कुठे ‘पार्क’ केलीय् ते बघून तिला माझा थांगपत्ता सहज कळतो. माझा ठावठिकाणा विचारण्याचं तिला वेळीच सुचतं. आणि मग बाईसाहेब अगदी मजेत मी असेन तिथे हजर होतात ! तिला कधी कुणी आवडत नाही. तिचा निखळ चांगुलपणा, तिची निरागसता, दुसऱ्याबद्दलची आस्था तिच्याबरोबर सावलीसारखी फिरत असते ना!

मला खात्री आहे- मी खूप दिवस भेटले नाही तर ती मला शोधत दूरदर्शनच्या स्टुडिओत येईल आणि मी बातम्या वाचत असताना तिथे ठिय्या देऊन बसेल. तिला कुणी अडवू शकणार नाही. ‘बघू ग, काय लिहीलंय् त्या समोरच्या बोर्डवर?’ हे कुतूहल नुसतं उच्चारून ती थांबणार नाही, तर ती सरळ बातम्या वाचून लागेल ! माझी लेक पुढे वृत्तनिवेदक होईल की नाही, मी सांगू शकणार नाही; पण माझ्या लेकीच्या आजीबद्दल मी खात्री देऊ शकेन. थोड्याशा धास्तावलेपणानंच…….

शी विल बी अ टफ् कॉम्पिटिशन………

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

चौकशी करा
चौकशी करा