प्रतीक्षा परिचारक, औरंगाबाद
गप्पागोष्टी, माहिती, ज्ञान आणि मनोरंजनाबरोबरच महिलांनी स्वतः ज्ञान समृद्ध होणे महत्त्वाचे आहे तसेच नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून काम करावे असे मत सुप्रसिद्ध निवेदिका, सूत्रसंचालिका, मुलाखतकार “ज्योती अंबेकर” यांनी व्यक्त केले. त्या शहरात एका कार्यक्रमानिमित्त आल्या होत्या. दिव्य मराठी सोबत संवाद साधतांना त्या बोलत होत्या, त्या म्हणाल्या उत्कृष्ट निवेदिका होण्यासाठी गप्पांची आवड असावी. आवाज चांगला असणे या गोष्टीही जमेच्या आहेत. विविध विषयांचे ज्ञान आत्मसात करण्यावर भर द्यावा. कुठलेही काम आत्मविश्वासाने करावे म्हणजे यश नक्कीच मिळते. महिलांनी समाजात स्त्री म्हणून न वावरता एक व्यक्ती म्हणून वावरावे असे त्यांनी सांगितले.
लातूर येथे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यावर त्यांनी औरंगाबाद येथील विद्यापीठात पत्रकारितेची पदवी घेतली. त्यानंतर औरंगाबाद आणि गोव्यात त्यांनी वृत्तपत्रांत काम केले. सध्या “ऑल इंडिया रेडिओत” वृत्त संपादक, वृत्त निवेदिका तसेच दूरदर्शनमध्ये वृत्त निवेदिका म्हणून काम करत आहेत तसेच सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय कार्यक्रमांचे सूत्रसंचालन त्यांनी केले आहे. अधिकारी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, वकील यांच्यासह अनेक मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या आहेत. केवळ आवड म्हणून त्यांनी हे क्षेत्र निवडले आणि बोलण्याचे कौशल्याचे शास्त्रोक्त शिक्षण त्यांनी डॉक्टर अशोक रानडे यांच्याकडून घेतले. आपल्याजवळ असलेले ज्ञान लोकांपर्यंत पोहोचावे म्हणून त्यांनी सोलापूर, औरंगाबाद, मुंबई येथे संवाद कला कार्यशाळा आयोजित केली. सुखसंवाद हा जाहीर संवाद साधण्याचा उपक्रम तीन प्रकारात सादर केला जातो, यातील पहिला प्रकार “आहे तुजपाशी” हा महिलांसाठी आहे तर “हे दिवस फुलायचे” युवतींसाठी आणि जेष्ठ नागरिकांसाठी “तुम्ही आम्हाला हवे आहात” असे आहेत. यात इंटरऍक्टिव्ह कार्यक्रमात अयोग्य आहार, कौटुंबिक विषय, मानसिक शांतता आणि व्यवस्थापन याविषयी प्रेक्षकांशी मोकळा संवाद साधतात.
संवाद कौशल्य समृद्धीच्या टिप्स –
- कोणतेही काम करताना ते आवडीने आणि मनापासून करावे.
- संवाद कौशल्य समृद्धीसाठी विविध विषयांचे ज्ञान असणे महत्त्वाचे आहे.
- आत्मविश्वासाने काम केल्याने संवाद कौशल्य समृद्ध होते.
- कामावर निष्ठा ठेवल्यास यश नक्की मिळते.