वास्तव्य:

मुंबई, अमेरिका, नाशिक

भ्रमणध्वनी:

+91 9869043016

इमेल:

yotiambekar@gmail.com

Published

28/05/2024

No Comments

Join the Conversation

काही करिअरची क्षेत्रे वैशिष्ट्यपूर्ण रचनेमुळे आपल्याला नेहमीच आकर्षित करतात. प्रसिद्धी माध्यमे ही नेहमीच यात अग्रेसर राहिली आहेत. वर्तमानपत्रे, दूरदर्शन, रेडिओ विविध प्रसारण वाहिन्या आणि त्यामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींबद्दल सर्वसामान्य लोकांना नेहमीच कुतूहल वाटत असते.  घराघरात पोहोचून पूर्ण जगाचे वर्तमान सांगणारा दूरदर्शन संच १९७०-७१  पासून लोकप्रियतेची एक एक पायरी चढत्या क्रमाने सर करीत आहे.  वाहिन्यांच्या अस्तित्वाने या क्षेत्रातही आधी निकोप आणि नंतर जीव घेण्यास स्पर्धेला सुरुवात झाली।  छोट्या गोष्टींचे पर्यवसन “ब्रेकिंग न्यूज” मध्ये करणाऱ्या  वाहिन्यांच्या गदारोळात सह्याद्री वाहिनीच्या बातम्या आजही विश्वासाहर्तेमुळे आवर्जून घराघरात पाहिल्या जातात. या बातम्या सांगणारा सर्व परिचित चेहरा म्हणजे “ज्योती अजय अंबेकर”   

त्या मूळच्या लातूरच्या. पूर्वाश्रमीच्या “ज्योती कुलकर्णी” सुलोचना व शशिकांत कुलकर्णी यांच्या त्या कन्या स्वतःच्या पायावर उभे राहण्याच्या आई-वडिलांच्या संस्कारांना त्यांनी परिश्रम चिकाटी यांची जोड देऊन ८७ मध्ये बी. कॉम, ८८ मध्ये बी. जे.  या पदव्या संपादन केल्या १९९२  मध्ये त्या केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन पुणे येथे “प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो” मध्ये रुजू झाल्या. तत्पूर्वी त्यांनी दिल्ली येथे राहून “इन्फॉर्मेशन सर्विसेस” मधील तीन महिन्यांचा आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमाही पूर्ण केला होता. आशिया खंडातील अग्रगण्य संस्था “इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन, दिल्ली” येथे इन्फॉर्मेशन सर्विसेस मधील तीन महिन्यांचा आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमाही पूर्ण केला होता.  केंद्र शासनाच्या माहिती प्रसारण विभागाअंतर्गत फिल्म डिव्हिजन क्षेत्रीय प्रचार कार्यालय “डायरेक्टोरेट ऑफ अॅडवरटायजिंग अँड व्हिजवल पब्लिसिटी इंडियन मॉनिटरिंग सर्विस” यांसारखी खाती येतात. माहिती अधिकारी म्हणून या खात्यांमध्ये सेवेची दालने त्यांच्यासाठी खुली झाली. पुणे येथील पोस्टिंग नंतर त्या मुंबई येथे दूरदर्शन मध्ये रुजू झाल्या. गेल्या दहा वर्षांपासून  त्या दूरदर्शनशी निगडित आहेत.  त्यांच्या कामाचे वेगळेपण म्हणजे त्या वृत्तनिवेदक आणि वृत्त संपादक अशी दुहेरी जबाबदारी पार पाडणाऱ्या पहिल्या व्यक्ती आहेत.

प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये श्लिल – अश्लीलतेपेक्षा संरक्षणात्मक, आंतरराष्ट्रीय नातेसंबंध, भारताची प्रतिमा माहितीची विश्वासाहर्ता, निकषांची पूर्तता या गोष्टींवर संपादक म्हणून भर देण्यात सह्याद्री वाहिनी अग्रेसर आहे. उथळ सवंग चटपटीत बातम्यांपेक्षा संयमी स्वीकार्य रोखठोक आणि अस्सल माहिती देणाऱ्या परंपरेमुळे ही वाहिनी आजही मराठी घराघरात “इन्फॉर्मेशन बरोबरच कन्फर्मेशन” साठी पाहिली जाते असे त्या नमूद करतात. इंग्रजी हिंदी वृत्तवाहिन्यांपेक्षा प्रादेशिक वृत्तवाहिन्यांमध्ये स्पर्धेची तीव्रता तुलनेने कमी आहे असे ज्योतीताई सांगतात. तरीही बातम्यांची वैशिष्ट्यपूर्णता राखण्यासाठी केवळ कंटेंट वरच भर देऊन भागणार नाही हेही त्यांच्या बोलण्यातून जाणवते. या क्षेत्रातील संधी जितकी आकर्षक वाटते तितकीच ती कष्टप्रद बांधिलकीची आहे असे त्या आवर्जून सांगतात.  रात्री उशिरापर्यंत करावे लागणारे काम, कामाचे गांभीर्य, बुद्धीची प्रगल्भता ही सारी नाण्याची दुसरी बाजू आहे मात्र, त्यांच्या पुरुष सहकाऱ्यांबरोबर काम करताना सुरक्षिततेचे  वातावरण असते. असुरक्षितता जाणवत नाही हेही त्या मनःपूर्वक मान्य करतात.  पती श्री. अजय अंबेकर यांचा ज्योतीताईंच्या वाटचालीत मोठा वाटा आहे.  शासनाच्या सांस्कृतिक विभागामध्ये श्री.  अंबेकर संचालक आहे, पण स्वतःच्या उन्नती बरोबरच पत्नीची ही प्रगती व्हावी, तिने केवळ घराच्या कार्यक्षेत्रात स्वतःला गुंतवण न घेता स्वबळावर स्वतःची ओळख निर्माण करावी यासाठी ज्योतीताईंना त्यांनी प्रोत्साहन दिले. केवळ एवढ्या पुरतेच न थांबता संसारिक जबाबदाऱ्याही वाटून घेतल्या.  पत्नीच्या प्रगतीचा आलेख चढता ठेवण्यात त्यांची मोलाचे योगदान दिले म्हणूनच एकत्र कुटुंबाबाबत अतिशय सकारात्मक प्रतिक्रिया ज्योती ताईंच्या बोलण्यात आली.  त्यांची मुलगी जयती हिने ही आईसारखेच मला वृत्तनिवेदिका व्हावयाचे आहे मात्र बीबीसी या वृत्तवाहिनीवर अशी मनीषा बाळगली आहे.

मराठवाडा गौरव हा पुरस्कार प्राप्त झालेल्या ज्योतीताईंची पावले मात्र अजूनही जमिनीवरच आहेत.  प्रिंट मीडियामध्ये काम करून मगच इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये प्रवेश करा असा सल्ला त्या  इच्छुकांना देतात. बातमीचे आणि तिच्या परिणामांचे गांभीर्य न ठेवता नैतिक बैठकीचे अवमूल्यन करून शोध पत्रकारितेचा टेंभा मिरवणाऱ्या वाहिन्या फार काळ टिकणार नाहीत असे त्यांना वाटते मात्र ही सवंग बाजारू लाट रोखणे लोकांच्याच हातात आहे हे त्या आवर्जून सांगतात. मराठवाड्याचा गौरव असलेल्या ज्योतीताईंना आमच्या शुभेच्छा ! –  मधुरा अन्वीकर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

चौकशी करा
चौकशी करा