वास्तव्य:

मुंबई, अमेरिका, नाशिक

भ्रमणध्वनी:

+91 9869043016

इमेल:

yotiambekar@gmail.com

Published

03/03/2024

No Comments

Join the Conversation

लातूरच्या दयानंद कॉलेजमध्ये असताना कॉलेजच्या वार्षिक कार्यक्रमात मी वृत्तांत लिहीत असे. त्यावेळी मी लिहिलेल्या चार ओळी जरी छापून आल्या तरी अवर्णनीय आनंद व्हायचा. या लिखाणाला पुढे प्रोत्साहन मिळत गेलं आणि पत्रकारितेतच काहीतरी करायचं असं ठरवलं. दैनिक लोकमत मध्ये सुरुवातीला विविध जबाबदारीची कामे पार पाडत गेले. काही चुकलं तर त्याच वेळी जाणून घेऊन त्याची दुरुस्ती केली. प्रामाणीकपणा आणि कष्ट हेच आपलं भांडवल आहे. ह्या दोन गोष्टी जर का तू आत्मसात करशील तर तुला आयुष्यात मागे वळून पहावे लागणार नाही. या मिळालेल्या शिकवणुकीचा अनुभव मला नेहमीच येत गेला.

साधारण पंचवीस वर्षांपूर्वी महिला पत्रकार हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या होत्या. दैनिक लोकमतमध्ये माझ्या करीयरच्या कक्षा विस्तारवणारा अनुभव मिळत गेला आणि जोडीला आयुष्य समृद्ध करणारा जोडीदारही तिथंच लाभला. देखणा, तेवढाच समंजस, बुद्धिमान आणि मोठ्या पदावरचा! मी खूपच भारावून गेले. त्याची अर्धांगिनी होऊन औरंगाबाद, गोवा, सातारामार्गे मुंबईला येणं झालं. मुंबईत आल्यावर इकडल्या गतीमान जीवनशैलीशी जुळवून घेणं थोडं कठीणच वाटू लागलं. गोव्यात असताना नवरा ऑफिसला गेला की रिकामा वेळ नकोसा वाटायचा आणि त्यातनं असा वेळ फुकट घालवणं माझ्या स्वभावात नव्हतं त्यामुळे सारखं निराश, उदास वाटायचं. वरकरणी सगळं छान चाललं होतं. ग्रामिण भागांतून येणाऱ्या स्त्रियांचे स्वतःचे असे काही प्रश्न असतात. ते शहरात राहणाऱ्यानां उमगत नाहीत. त्यावेळी माझ्या जोडीदाराने माझी फार समजूत घातली. तो पिता झाला, भाऊ झाला.

‘ज्योती तू बाहेर पद हळूहळू सगळं जमेल तुला.’

गोव्यात गोमंतकमध्येही नोकरी केली होती. तसेच केंद्रसरकारच्या ब्युरोमध्ये निवड झाली व प्रेस इन्फर्मेशनमध्ये होते. शिवाय न्यूज रीडर, अनाउन्सर ह्या परीक्षाही पास होते. योगायोगाने माझं राहत ठिकाण वरळी. त्यामुळे जवळच दूरदर्शन केंद्र होतं. यांच्या पाठिंब्यामुळे सह्याद्रीवर मुलाखतीला गेले. तिथे गेल्यावर प्रचंड घाबरले होते. मला स्क्रीनची खूप भीती वाटत होती. प्रदीप भिडेंना पाहून तर धडकीच भरली. टी परीक्षा मात्र पास झाले. एकून बारा हजार विद्यार्थ्यांमध्ये पहिली आले. याचा अर्थ माझ्यात काहीतरी आहे हे जाणवलं. त्याचक्षणी माझे सगळे न्यूनगंड गळून पडले. त्यानंतर आणखीन एकदा आयुष्याला कलाटणी मिळाली. त्यामागे एक छोटीशी कथाच आहे. माझ्या पतीची पोस्टिंग गोवा-पणजीला झाली. माझी मुलगी लहान असल्याने तिच्या संगोपनासाठी मी नोकरी सोडली. घरातलं आटपलं की भरपूर वेळ हाताशी असायाचा. वर राहत घर आणि खाली त्यांचं ऑफिस आणि एक सुंदरशी लायब्ररी. त्यावेळी मी त्या वेळेचा उपयोग करून भरपूर वेड्यासारखं वाचन केलं. तरीही एक प्रकारची अस्वस्थता जाणवत राहायची. मग त्यांच्या सांगण्यावरून मी यूपीएससीची परीक्षा दिली. परीक्षा उत्तीर्ण झाले; पण पोस्टिंग मात्र पुण्यात मिळाली. मुलगी लहान, सोन्यासारखा संसार मांडलेला इथं पतीसोबत गोव्यात! मनाची परिस्थिती पुन्हा द्विधा झाली.

परत एकवार माझ्या पाठीवर त्यांचा मायेचा हात विसावला. ‘शांत डोक्याने विचार कर, ही संधी सोडू नकोस.’

मी आनंदाने पुण्यातली पोस्टिंग स्वीकारली. जिथे मी वृत्तनिवेदिका होते तिथंच वृत्त्संपादिका, एक अधिकारी म्हणून रुजू झाले तिकडे सगल्यांना आश्चर्यच वाटलं.

त्यानंतर मात्र मी कधीच मागे वळून पाहिलं नाही. दूरदर्शन बातम्या , मुलाखती , जाहीर मुलाखती , जाहीर निवेदन , साहित्य संमेलन , अमेरिकेतील नाट्यसंमेलन , एकपात्री संवाद , बांद्रा कुर्ला कोम्प्लेक्सच्या उद्घाटनाला सोनिया गांधी आल्या त्यावेळी तेव्हा सर्व निवेदन पूर्ण इंग्रजीमधून केलं. राष्ट्रपती आले तेव्हा विधिमंडळाचे समालोचन अशा विविध रुपाने प्रकट होत गेले. तसेच आकाशवाणीवर वृत्तसंपादक ,योजना मासिकाची संपादक ,योजना सेल्स इम्पोरियमची सेल्स म्यानेजर अशा विविध पदांवर कामे केली. खरचं करियर मागे मी धावले नाही तर करीयरच माझ्यापर्यंत चालत आलं.

या सगळ्याचं श्रेय मी माझे पती अजय अंबेकरांना देईन. ते एकतर माणूस आणि पती म्हणून प्रत्येकवेळी माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. वेळोवेळी त्यांनी माझ्या कलानं घेतलं. धीर देणं, समजून सांगणं, माझ्यात दडलेल्या हट्टी मूलपणाला त्यांनी शांत केलं. मी सारखी घाबरून नन्नाचा पाढा वाचायचे. मला त्यातनं त्यांनी बाहेर काढून माझ्या व्यक्तिमत्वाला एक नवा आकार दिला. अर्थात माझ्या परिश्रमांची जोडही होतीच.

आपल्यात नवीन काही करायची उर्मी आहे, उर्जा आहे हे कळल्यावर स्वःताला केवळ दूरदर्शन आणि आकाशवाणी यांच्या चौकटीत बंदिस्त न ठेवता इतरही कार्यक्रम राबवायला सुरुवात केली. त्यामुळे विविध क्षेत्रातल्या महान व्यक्तींच्या संपर्कात आले. स्त्रियांच्या आयुष्यात वेगवेगळ्या टप्प्यावर कमालीची स्थित्यंतरे येत असतात. त्यासाठी मी काही कार्यशाळा भरवल्या. त्यासाठीची आर्थिक जबाबदारीही उचलली. माझा मिडिया पार्टनर महाराष्ट्र टाईम्स होता. तसेच आवाजाच्या कार्यशाळाही घेतल्या. त्यात अमीन सयानी पासून सुलभा देशपांडे, अनिल अवचट , मुक्ता बर्वे इ. उपस्थित होते. ह्या उपक्रमातून मला प्रचंड समाधान आणि आत्मविश्वास मिळाला. सगळं काही आरामात उपलब्ध असूनही ठराविक उंची गाठण्यासाठी कष्ट हे घ्यावेच लागतात. त्यातही आनंद होता. संस्कार पक्के होते. कोणती गोष्ट करायची नाही हे खूप लहानपणापसून कळायला लागल्यामुळे पाय नेहमी योग्य मार्गाकडेच वळले. पुढे जाण्यासाठी आयुष्यात शोर्टकट वापरू नये ह्या मताची मी आहे. तेच संस्कार माझ्या माहेरच्यांनी दिले आणि लग्नानंतर सासरच्यांनी.

माझ्या सासूबाईंचा निर्मळ स्वभाव मला खूप आवडतो. आज पंचवीस वर्षानंतर सुद्धा आम्हा दोघांचे घट्ट नाते आहे. याविषयी एक छान आठवण आहे. वडीलधाऱ्या माणसांचं वय झालं की त्यांना बऱ्याच गोष्टींची आवड राहत नाही. एकदा मातृदिनाच्या दिवशी विचार केला सासूबांईना काय बरं भेटवस्तू द्यावी? मग त्या दिवशी एक लेख लिहिला – सप्रेम भेट, नि दिलं माईना. माझ्या मते असंही प्रेम करता येतं. ते टिकवाव अन् ते टिकवल्यावर त्याची वाच्यता करावी.

विश्वासाच्या आधारावरच घर आणि करियर यांची सांगड घालता येते. मी माझ्या कुटुंबातल्या प्रत्येक सदस्याला कायम विश्वासात घेतलं. माझ्या सासर माहेरच्या माणसांना एकत्र आणत मला काय म्हणायचंय , मला काय कारावसं वाटतंय अगदी मोकळेपणाने सांगत गेले. माझ्या लेकीसमोरही तिच्या लहानपणापासून मी नेहमी मोकळेपणाने व्यक्त होत गेले तिचाही विश्वास संपादन केला. त्यामुळे तिला हे कळायला वेळ लागला नाही की आई करायला धडपडतेय. बऱ्याचवेळा मी दूरदर्शनवर लाईव्ह बातम्या देत असायची आणि ती समोर बसून शांतपणे स्वःताचा अभ्यास करत बसायची. आई असो वा बाबा , मुलांशी जुळवून घेणं त्यांच्यासाठी दोन पावलं मागे यायची तयारी ठेवली तर आयुष्यात बरंच काही मिळवता येतं. माझ्या मुलीच्या बाबतीतली एक हळूवार आठवण सांगायला आवडेल. ती जेव्हा अमेरिकेला शिक्षणासाठी निघाली तेव्हा मला रडू आवरेना. तेव्हा तिने मला जवळ घेऊ, आईच्या ममत्वाने डोक्यावर हात फिरवत माझे डोळे पुसले म्हणाली, ‘तुला तुझंही भविष्य आहे, त्याचा विचार कर.’ आयुष्यात अविस्मरणीय क्षण होता तो माझ्यासाठी.

माझ्या मते थोडसं वेळेचं नियोजन केलं की सगळं जमून येतं. वाचन, लेखन, स्वयंपाक, बागकाम, गप्पा मारणं, वॉकला ,जिमला जाणं, सिनेमे नाटकं पाहणं, आवडत्या कुत्र्याची देखभाल करणं हे सगळं मला आवडतं. माझी लेक मला कौतुकाने म्हणते, ‘काय गं, तुझ्या दिवसाचे ४८ तास आहेत का?’ मी मराठवाड्यातून आलेली पहिली मुलगी जी दूरदर्शनच्या सेवेत रुजू झाली. म्हणून माझा मराठवाडा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. मला इतरही अनेक पुरस्कार, सन्मान प्राप्त झाले जसे प्रज्ञा पुरस्कार, कुसुमताई चव्हाण पुरस्कार इ.

आयुष्य खूप सुंदर आहे. तुमच्यातलं लहान मुल कधीच हरवू देऊ नका. प्रत्येक स्त्रीला जेव्हा एखाद्या ठराविक टप्प्यावर अस्वस्थतता जाणवते तेव्हा समजावं आपल्याला जीवनात काहीतरी करावासं वाटतय. स्वतःच्या अंतर्मनाचा कौल घ्या. आतला आवाज कधीच दबू नका. बऱ्याच बायका आपल्या मनाशी बोलतच नाहीत. स्वतः च्या आवडीनिवडी कडे दुर्लक्ष करतात.प्रत्येकात काही न काही दडलेलं असतं. ते शोधणं गरजेचं आहे. जसा मी माझा पिंड ओळखला तसा तुम्ही तुमचा पिंड ओळखा. एकदा सापडला की त्याला आकार देणं पुढचं काम. मग मेहनतीच्या बाबतीत कुठलीच तडजोड नाही.

आपण मांडलेला संसार खूप छान असतो. घराबाहेर झेप घेताना आपले कुटुंबिय , जोडीदार यांना विसरोन चालत नाही. नाहीतर या प्रवासात आपण खूप काही गमावतो. येणारा प्रत्येक दिवस माझ्यासाठी नवीन असतो. त्या नवीन दिवसाच्या स्वागतासाठी मी मस्तपैकी तयार असते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

चौकशी करा
चौकशी करा