अहमपणा न ठेवता पुढे जायचं आहे..
लातूर सारख्या ग्रामीण भागातून शिक्षण घेत घेत लातूर औरंगाबाद व्हाया गोवा अलिबाग मुंबई असा प्रवास, प्रवासाप्रमाणेच करिअरचा ग्राफही चढती कमान सांगतोय हे करिअर आहे “ज्योती अंबेकर” यांचे. पाच मुली आणि एक मुलगा असा मोठा परिवार सांभाळणाऱ्या वडिलांनी शिक्षणाचं व स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे स्वप्न कायम बिंबवलं. त्यामुळे ज्योतीला शिक्षणासाठी वडिलांनी कधीच नाही म्हटलं नाही परंतु ग्रॅज्युएट झाल्यानंतर जर्नलिझमचा कोर्स लातूर सारख्या ठिकाणी उपलब्ध नव्हता आणि ज्योतीने लातूरमध्ये छोटे-मोठे वृत्तांत वृत्तपत्रात लिहिणं सुरू केलं होतं तिथेच जर्नलिझम करावं असं बऱ्याच जणांनी सुचवलं देखील होतं आणि काहीतरी शिकायचं आहेच स्वतःच्या पायावर उभे राहायचं आहेत तर औरंगाबादला जाऊन ते शिकवा अशी इच्छाही बळावू लागली होती. परंतु वडिलांचा बाहेरगावी होस्टेलमध्ये जाऊन राहायला व शिकायला तसा विरोध होता तिचे वडील शिक्षणाचे महत्त्व जाणणारे परंतु कडक शिस्तीचे अर्थात माझ्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नकोस असं सांगून वडिलांनी तिला कोर्सला पाठवलं आणि तीनही त्यांचा विश्वास सार्थ ठरवत “जर्नलिजम” चा कोर्स पूर्ण केला. कोर्स करता करता लोकमत मध्ये लिखाण, औरंगाबाद आकाशवाणीवर निवेदन कार्यक्रम तिने सुरू केले. लोकमत मध्ये सर्व प्रकारचे काम करायला मिळाल्यामुळे पत्रकारितेतल्या अनेक कामांचा अनुभव मिळाला. लग्नानंतर तिचे पती अजय अंबेकरही याच क्षेत्रातले असल्यामुळे त्यांनीही तिला खूप प्रोत्साहन दिलं. पतीच्या फिरतीच्या नोकरीमुळे अलिबाग, गोवा अशा ठिकाणी राहणं झालं. तिथेही शांत न बसता काहीतरी काम सुरूच होतं.
गोव्यात असतानाच यूपीएससीची परीक्षा देऊन पुण्याला पी. आय. बी. मध्ये ती रुजू झाली पुण्यात नोकरी मुलगी, पती, सासुबाई सांगलीमध्ये असायचे व ती जाऊन येऊन. त्यानंतर मुंबईतल्या पी.आय.बी मध्ये तिची बदली झाली आणि नंतर मुंबई दूरदर्शनला न्यूज एडिटर म्हणून ती रुजू झाली. त्याआधी वृत्त निवेदक म्हणूनही तिने परीक्षा दिली होती व पहिल्या अव्वल जणांमध्ये आपण आलो आहोत हे कळल्यामुळे तिच्या मधला आत्मविश्वास खूपच वाढला गावाकडून आल्यामुळे किंवा स्वतःला सिद्ध करून दाखवण्याची तशी खूप मोठी संधी आधी मिळाली नसल्यामुळे थोडासा न्यूनगंड तिच्यामध्ये सुरुवातीला होता पण एका मागोमाग एक परीक्षा दिल्यामुळे तिच्यामध्ये आत्मविश्वास दुणावला आणि 2000 नंतर तिची घौडदौड घौडदौडच सुरू झाली. स्वतःला एक वृत्त निवेदक म्हणून घडवण्यासाठी तिने बरीच मेहनत घेतली. आज वृत्त निवेदक म्हणून काम करताना विधिमंडळ साहित्य संमेलन, नाट्य संमेलनाचे वृत्तांत करणे अशी आव्हानात्मक कामही ती करत आहे. मुंबईत स्थिरस्थावर झाली असली तरी मराठवाड्यात पत्रकारितेवर व्याख्यान द्यायला ही ती जात असते. मागे वळून पाहताना आपल्याला खूप मिळाला आहे आणि पुढे जातानाही कोणताही अहंपणा न ठेवता पुढे जायचं अशी तिची धारणा आहे. – शिवानी जोशी.