सह्याद्रीची वृत्त निवेदक ज्योती अंबेकर.
प्रसिद्धी माध्यमे करिअरच्या दृष्टीने तरुण-तरुणींना नेहमीच आकर्षित करीत असतात. या माध्यमातून विशेषतः दूरदर्शन तसेच प्रसार वाहिन्यात काम करणाऱ्या लोकांचे ही सर्वसामान्यांना आकर्षण असते. प्रसार माध्यमांची वाढती स्पर्धा, निर्माण झालेला जीवघेणा संघर्ष ही आपण अनुभवतो, तरीही आज सर्वसामान्यांच्या विश्वासाहर्तेला उतरलेली वाहिनी म्हणजे “सह्याद्री वाहिनी.” या वाहिनीवरील बातम्यांची विश्वासाहर्ता, भारताची प्रतिमा, आंतरराष्ट्रीय नातेसंबंध, सामाजिक बांधिलकी इत्यादींवर दिला जाणारा भर यामुळे सह्याद्रीने “सह्याद्री वाहिनी प्रत्येक घरासाठी घरातील प्रत्येकासाठी” हे घोषवाक्य सार्थ केलेले आहे. या वाहिनीवर वृत्तसंपादन आणि वृत्त निवेदक अशी दुहेरी जबाबदारी पार पाडणारी व्यक्ती म्हणजे ज्योती अजय अंबेकर. (पूर्वाश्रमीची ज्योती कुलकर्णी.)
मराठवाडा गौरव पुरस्काराने मुंबई येथे रवींद्र नाट्य मंदिरात ज्योती अंबेकरला नुकतेच सन्मानित करण्यात आले. यशोशिखरावर विराजमान झालेली ज्योती पायऱ्या मात्र विसरली नाही, म्हणूनच तिच्या आजवरच्या यशाच्या वाटचालीत औरंगाबादच्या दैनिक लोकमतचा वाटा असल्याचा उल्लेख आवर्जून करते. ज्योती म्हणते, इथपर्यंत आल्यानंतर मी मागे वळून पाहते तेव्हा मला असं जाणवतं की माझ्या करिअरची सुरुवात मी दैनिक लोकमत मधून केली. तेथे दोन-तीन वर्षांच्या कालावधीत मला वृत्तपत्रातील निरनिराळ्या विभागात काम करण्याची संधी मिळाली. त्याचा मला पुढे या क्षेत्रात काम करताना निश्चितच फायदा झाला. म्हणूनच, मराठवाडा गौरव पुरस्काराबद्दल माननीय राजेंद्र बाबू दर्डा यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. आशु ताईंनी लोकमत सखी मंचच्या कार्यक्रमात येणार का ? म्हणून विचारल्याचे सांगताना तिच्या चेहऱ्यावर आनंद उसळून वाहत असतो. या कारण हा खऱ्या अर्थाने तिच्या माहेरच्यांनी केलेल्या गौरव असतो.
ज्योतीने लातूर येथील महाविद्यालयीन जीवनात लेखनाला केलेला प्रारंभ, त्याला मिळालेल्या प्रोत्साहनाने मराठवाडा विद्यापीठात वृत्तपत्र विद्या विभागात बी. जे. साठी घेतलेला प्रवेश, दैनिक लोकमत मध्ये निरनिराळे विभागात केलेले काम, आकाशवाणी केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षा, इन्फॉर्मेशन सर्विसेस मधील दिल्ली येथे तीन महिन्यांचा आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रम पूर्ण करणे, आशिया खंडातील अग्रगण्य संस्था इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन, पुणे येथील प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो नियुक्ती त्यानंतर आस्थागायत मुंबई दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवर वृत्तसंपादन आणि वृत्तनिवेदन अशी दुहेरी जबाबदारी असलेला प्रवास झाला आहे.
आपल्या क्षेत्रात पडेल ते काम करावे, छोटे की मोठे याचा विचार करू नये, वाट्याला आलेले काम एक चांगली संधी म्हणून स्वीकारावे असे ज्योतीला वाटते. तिच्या या दृष्टिकोनामुळे तिने आपल्या कामात एक वेगळाचं ठसा उमटवला आहे. या दृष्टिकोनातून यश मिळवायचे असेल तर आपल्या वाट्याला येणारे काम सुसंधी म्हणून स्वीकारा असा संदेशही ज्योती नकळत देऊन जाते. त्याचप्रमाणे वृत्तनिवेदन करताना पोशाखातील निवडीकडेही तिचा कटाक्ष असतो.
सुरुवातीला मुंबईच्या जीवनशैलीत गोंधळलेली, गर्दीला वैतागलेली तरीही मुंबईतील माणसाची चिवटपणे जगण्याची जिद्द तिने कौतुकाने अनुभवली, वातावरणाशी जुळवून स्वतः बदल घडवून आणला, केव्हा मुंबईकर झाली हे कळलंही नाही. या सर्वात ज्योतीच्या स्वभावात मात्र कुठेही बदल झाला नाही. तिच्या स्वभावाचा विशेष म्हणजे प्रत्येक माणसाकडे निर्मळ मनाने पाहायचं, आपणांस जे जे ठावे तेथे इतरांना द्यावे या उक्तीप्रमाणे या क्षेत्रात येण्यासाठी धडपडणाऱ्यांना ती मार्गदर्शन करीत असते. आपल्याला जगण्याकडून खूप मिळालं, माझ्या जगण्याकडून फार अपेक्षाच नाहीत. आज जे समोर आलेलं आहे त्याचा मी आनंदाने स्वीकार करीन असं विचार सूत्र असल्यामुळेही ती नेहमीच आनंदी असते. मुलगी आपल्या जन्माने सासर माहेर दोन्ही कुळाचा उधार करते असं म्हणतात, ज्योतीच्या जडणघडणीत तिच्या आईचा सुलोचना कुलकर्णींचा संस्कारांचा, कष्टाचा, आपल्या लेकीने वेगळ्या क्षेत्रात करिअर करून यशस्वी होण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या त्या स्वप्नाला सत्यात उतरविताना भक्कम आधार विश्वास, अभिमान देणाऱ्या वडील शशिकांत कुलकर्णी यांचा महत्त्वाचा वाटा आहे.
ज्योतीच्या प्रगतीच्या चढत्या आलेखाचे श्रेय तिचे पती अजय अंबेकर, महाराष्ट्र सांस्कृतिक विभागाचे संचालक यांच्या प्रोत्साहनाला देखील आहे. आपल्या पत्नीने केवळ अर्थार्जनासाठी नोकरी न करता तिच्या आवडीच्या क्षेत्रात सतत पुढे जावे असा विचार करून त्यांनी दैनंदिन जीवनात अंमलबजावणी करणारे, खऱ्या अर्थाने नातिचे रामी वचनपूर्ती करणारे आहेत आपल्याला माहेर इतकेच प्रेम,खंबीरपणे उभे राहण्याचे सामर्थ्य सासरच्या लोकांनी देखील दिले असे सांगून ज्योती आपल्या सासूबाईंचा उल्लेख प्रेमाने आदराने ज्ञानेश्वर माऊली असा करते. आपल्या कामाप्रती बांधिलकी मांडणारी ज्योती कौटुंबिक पातळीवरही तेवढीच बांधिलकी मानते. कौटुंबिक जिव्हाळ्यात अखंड बुडालेल्या ज्योतीचे स्वप्न सर्वसामान्य गृहिणीचे असावे असेच आहे. ती म्हणते, मला आदर्श आई होता यावं एवढंच माझं स्वप्न आहे आणि ते प्रत्यक्षात उतरविण्यासाठी ज्योतीने जेवढा जास्तीत जास्त वेळ आपल्या मुलीसाठी देता येईल तेवढा दिला. आपल्या मुलीने सर्वत्र बहराव, पुढे खंबीरपणे स्वतःच्या पायावर उभ राहावं म्हणून सर्व संधी उपलब्ध करून दिल्या. त्याचबरोबर जबाबदारीची जाणीवही म्हणून ८५ % गुण मिळवून एसएससी परीक्षेत उत्तीर्ण होणारी तिची मुलगी जयती एकटी परदेशवारी करून येते, चौफेर वाचन करते, दैनंदिन व्यवहारातील बँकेचे काम असो व स्वयंपाक उत्तमरीत्या करते. आपल्या मुलीच्या व्यक्तीमत्त्वाचा पाया भक्कम बांधला त्यावर किती मजले चढवायचे याचे स्वातंत्र्य ही मुलीला देऊन ती समाधानी आहे.
नाट्य संमेलन असो की विधिमंडळ समालोचन व सहज बोलणं ज्योतीचं बोलणं खूप उपगत असतं आपल्या अनुभवातील गाठोड्यातील गोष्टींचा इतरांनाही लाभ व्हावा म्हणून तिने लिहावं असे तिचे पती अजय अंबेकर बहीण तसेच आम्हा मित्र परिवारालाही वाटते. ज्योतीला पुढील उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा !
सौ शैलजा सुनील धोकटे.
सुयश अपार्टमेंट नागेश्वरवाडी, औरंगाबाद.