प्रसार माध्यम क्षेत्रातील बदलत्या आव्हानांना पत्रकारांनी सामोरे जावे. – सौ. ज्योती अजय अंबेकर.
प्रश्न- आपलं बालपण कसे गेलं त्या दिवसाच्या काही आठवणी सांगू शकाल का ?
सौ. ज्योती अंबेकर – पारंपारिक कुटुंबात मी मोठी झाले. परंतु, शिक्षणाचे महत्त्व आई-वडिलांनी आम्हाला वेळीच पटवून दिले होते. घरात शिस्तीचे पण व्यक्तिमत्व विकासाला पूरक वातावरण लाभल्यामुळे आम्ही बहिणी व भाऊही सर्वार्थाने घडलो. आज मी आई झाल्यावर मला समजतं मुलांना वाढवणं किती जबाबदारीचे काम असते.
प्रश्न – पत्रकारिता क्षेत्रात आपलं पदार्पण कस झालं ?
सौ. ज्योती अंबेकर – आमच्या घरात शिक्षणाला खूप महत्त्व होतं. वडील नेहमी सांगायचे परीक्षेत चांगले मार्क नाही मिळाले तर शाळा रेल्वे पटरीनंतर घर तेव्हा, त्यांच्या धाकापाई आम्ही शिकत गेलो. अवांतर वाचन, लिखाण, नाट्य, कला, साहित्य यामध्ये मला विशेष रुची होती. त्यामुळे, लातूरहून थेट औरंगाबादला विद्यापीठात बी. जे. साठी प्रवेश घेतला. घरातून स्वातंत्र्य असल्यामुळे आणि त्यांनी दाखविलेल्या विश्वासामुळे मला काहीही करताना कुणाचीही अडकाठी आली नाही. त्याकाळी या क्षेत्रात ग्लॅमर नव्हते. आजच्या इतका झगमगाटही नव्हता.
प्रश्न – अजय अंबेकर यांच्याशी आपला प्रथम परिचय कसा आणि कुठे झाला ?
सौ. ज्योती अंबेकर – औरंगाबाद विद्यापीठाच्या होस्टेलवर आमचा कॉमन मित्र असलेल्या व्यक्ती समवेत मी त्यांना भेटले. अंबेकर त्यावेळी आम्हाला लेक्चर देण्यासाठी येत असत पण मी एकदाही त्यांचे लेक्चर अटेंड केले नव्हते. दैनिक लोकमत, आकाशवाणी व इतर उपक्रमात मी व्यस्त असल्यामुळे कुणाचेही फारसे लेक्चर अटेंड करू शकत नव्हते पण अंबेकरांनी आमच्या एका भेटीनंतर लगेचच मला लग्नासाठी प्रपोज केले. यथावकाश त्यांना होकार देऊन आम्ही जन्मजन्मान्तरीचे जीवनसाथी झालो.
प्रश्न – दूरदर्शन वृत्तनिवेदिका म्हणून आपली निवड कशी झाली ?
सौ. ज्योती अंबेकर – आपण ग्रामीण भागातून आलेलो आहोत हा न्यूनगंड मनात होताच तत्पूर्वी यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण झाले होते. शिक्षण, वाचन, लिखाण असले तरी आरंभी करिअर वगैरे कसलेही खुळ माझ्या मनात नव्हते पण अंबेकरांना आपली पत्नी कर्तुत्ववान असावी असे वाटत होते. त्यांच्या अपेक्षा त्यांनी मला एकदा बोलून दाखविल्या होत्या. एकदा दूरदर्शनची यासंबंधीची जाहिरात पाहण्यात आली व लगेचच मी अर्ज करून त्यांच्या सगळ्या परीक्षेत अनेक स्पर्धकांमधून पहिली आले त्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली.
प्रश्न – दूरदर्शन वृत्त निवेदिका म्हणून आलेला अनुभव सांगाल का ?
सौ. ज्योती अंबेकर – या क्षेत्रात कामाचा खूपच ताण असतो. पुढे याचीही सवय होऊन जाते. प्रथमतः बातम्या देताना खूप घाबरलेले होते पण माझे पती अंबेकर यांनी मला खूप धीर दिला. या क्षेत्रात स्थिरस्थावर होण्यासाठी बऱ्याच गोष्टी समजून सांगितल्या. त्यानंतर माझ्यातील आत्मविश्वास वाढत गेला. काही वेळा तांत्रिक कारणामुळे बऱ्याच गमतीजमती घडतात बातम्या देताना समोरील शब्द वाचताना गडबड होते, काही वेळा ऐनवेळी वेळ मारून नेण्यासाठी बऱ्याच क्लुप्त्या कराव्या लागतात. एका न्यूज रीडर वर सगळ्यांचे परिश्रम निगडित असतात. हे एक टिमवर्क असतं. प्रत्येक शब्द उच्चारताना आवाजातील चढ-उतार विशेषतः नाव घेताना काळजीपूर्वक घ्यावे लागतात. त्यानंतर, मी तसे म्हणालेच नाही असे म्हणता येत नाही कारण स्क्रीनवर हे सगळं दिसतं. हे खूप जबाबदारीचे काम आहे या चुकांना क्षमा नसते.
प्रश्न – आज अन्य वाहिन्यांमुळे या स्पर्धेत दूरदर्शन मागे पडले आहे याबद्दल आपण काय बोलू इच्छिता –
सौ. ज्योती अंबेकर – दूरदर्शन हे एक शासकीय माध्यम आहे. तेव्हा बातम्या प्रसारित करताना प्रत्येक बातमीची शहानिशा करून आणि खात्री करूनच आम्ही बातम्या देतो याबाबत आमचा संपादकीय विभाग विशेष दक्ष असतो. मात्र, सांगायला अत्यंत वाईट वाटते की इतर खाजगी वाहिन्या प्रसार माध्यमांची ही तत्व आणि पारदर्शकता बाजूला ठेवून सबसे तेज म्हणताना हाती आले ते वृत्त घाईघाईने प्रसारित करून मोकळे होतात. यामध्ये चॅनेलचा गौरव व्हावा म्हणून बातम्या भडक करून देणे, सनसनाटी देणे यातच त्यांना आनंद वाटतो. यामुळे, आपली विश्वासाहर्ता राहते की नाही याचा फारसा विचारही हे वाहिन्यांचे संचालक करीत नाही. त्यामुळे जनता संभ्रमित होते व पुन्हा खऱ्या वृत्तासाठी लोक दूरदर्शनकडे पळतात.
प्रश्न – पूर्वी मुंबई दूरदर्शनवर अनेक बहारदार कार्यक्रमांची रेलचेल असायची व आजची परिस्थिती याबद्दल आपण काय बोलू इच्छिता –
सौ. ज्योती अंबेकर – आज सगळ्याच क्षेत्रात कमर्शियललायझेशन झाले आहे. प्रसारमाध्यम क्षेत्र ही त्यातून सुटलेलं नाही. असंख्य खाजगी वाहिन्यांमुळे भारतीय जनता गोंधळून गांगरून गेली आहे पण दर्जेदार कार्यक्रम देणे ही दूरदर्शनची खासियत आहे. त्यात आम्ही कुठेही कमी पडत नाही आहोत या वाहिन्यांच्या स्पर्धेमुळे शांतपणे प्रबोधनपर विचार श्रृंखला पसरविणे, दूरदर्शन आपले काम आपल्या मूल्यांशी व तत्वांशी बांधील राहून करीत आहे यात शंका नाही. आता मी पाहते मुंबईतही बौद्धिक व प्रबोधनपर विचार मांडणाऱ्या कार्यक्रमांना लोकांची गर्दी वाढत आहे वैचारिक मंथन करण्याची लोकांची मूळ वृत्ती पुन्हा उफाळून येत आहे हेच खरे.
प्रश्न – आज असंख्य वाहिन्यांमध्ये गलेलठ्ठ पगारांची नोकरी मिळत असतानाही तुम्ही दूरदर्शनलाच का आपलं कामाचं क्षेत्र मानलं मानता ?
सौ. ज्योती अंबेकर – अगोदरच सांगते मला पैशाचा अजिबात मोह नाही. आपलं फॅमिली लाईफ सांभाळून व जॉबसाठीच फ्रॅक्शन मला दूरदर्शनवर काम करताना मिळत असेल तर ओके. नुकतीच माझी एक मैत्रीण एका खाजगी वाहिनीतून काम सोडून दूरदर्शनवर कामासाठी जॉईन झाली यातूनच तुम्ही काय ते समजून घ्या या क्षेत्रात प्रचंड मेहनत घ्यावी लागते. आजचं काम झालं पण उद्या यापेक्षा किती चांगलं काम करू शकू ही स्पर्धा आहे. यासाठी नेहमी अलर्ट राहून आज आपण लोकांना काय चांगलं देऊ शकू याच विचारात मी कार्यमग्न असते. स्वतः ग्रामीण भागातून आल्यामुळे व आता शहरात वास्तव्य करत असल्यामुळे दोन्ही समाजमनाची नाडी मी ओळखून आहे व तसं भानही मला आहे आपल्या कामात अधिकाधिक सुधारणा व्हावी यासाठी सी. एन. एन. व नामांकित वाहिन्यांच्या बातम्या मी विशेषतः ऐकते. दूरदर्शनलाच भक्ती बर्वे इनामदार यांनी मोठी उंची प्राप्त करून दिली. यामध्ये त्यांनी स्वयंप्रेरणेने अनेक प्रयोग करून दूरदर्शनवरील बातम्यांना चांगला दर्जा मिळवून दिला त्यांनाही मी आदर्श मानते। यामुळे दूरदर्शन आज लाखो लोकांच्या मनात घर करून आहे. आज प्रसारमाध्यम क्षेत्रातही चांगले बदल घडून येत आहेत. आपण सर्वांनीच त्याचं स्वागत करून ती आव्हानं स्वीकरावीत असेच मला वाटते.
प्रश्न – दूरदर्शन वृत्त निवेदिका म्हणून अनेक नामांकित व प्रसिद्धीच्या झोतातील व्यक्तींचा सहवास लाभला आहे, त्याबद्दल काय सांगू शकाल –
सौ. ज्योती अंबेकर – चित्रपट, नाट्य, कला, साहित्य, राजकारण, समाजकारण आदी विविध क्षेत्रातील थोरामोठ्यांचा सहवास मला लाभला. अगदी लतादीदींपासून ही नावाची यादी खूप मोठी आहे. खरंच त्यांचा संघर्ष खूप मोठा आहे. संपूर्ण आयुष्य त्या क्षेत्राला समर्पित करणारी ही मंडळी बघितल्यावर त्यांची कारकीर्द पाहून मीच थक्क होते. आपण त्यांच्यापुढे कोणीच नाही आहोत याची जाणीवही प्रकर्षाने होते. त्या अनेकांच्या बोलण्यातली एकसारखीच बाब म्हणजे सुरुवातीला नाव मिळविण्यासाठी झगडायचं, अफाट जीव ओतून परिश्रम करायचे आणि त्यानंतर मिळालेलं नाव टिकवण्यासाठी पुन्हा मेहनत घ्यायची आज हिच कर्तुत्ववान माणसं माझी प्रेरणास्थान आहेत. त्यांच्याकडे बघून स्वतःलाही खूप काही करण्यासाठी प्रोत्साहन मिळते.
प्रश्न – आपल्या भावी योजनांबद्दल आपण काय सांगू शकाल ?
सौ. ज्योती अंबेकर – आज दूरदर्शन वृत्तनिवेदिका म्हणून मी घराघरात पोहोचली आहे. पत्रकारितेतील बदलते प्रवाह समजून घेऊन त्यातही नवनवीन काहीतरी करण्याचा माझा मानस आहे. आता विद्यापीठातून या विषयांवर विद्यार्थ्यांना शिकवायलाही मला आवडेल. नावाजलेली सूत्रसंचालिका म्हणूनही माझे नाव व्हावे यासाठी ही सध्या प्रयत्नशील आहे. आज मुंबई, पुण्यात चांगले सूत्रसंचालक खूप बिझी आहेत. यामध्ये प्रतिष्ठा व पैसा अमाप आहे. सुधीर गाडगीळ व मंगला खाडीलकर यांनीही या क्षेत्रात चांगली परंपरा निर्माण केली आहे. नांदेड व अन्य भागातील हा ट्रेंड आता येणार आहे. संवाद शास्त्राच्या क्रांतीमुळे सर्व मानवी जीवन अमुलाग्र बदलत असून हे बदल प्रगत तंत्रज्ञानासह माणसं जोडणारी असावेत हिच अपेक्षा आहे. तेव्हा असंख्य होतकरू तरुण-तरुणींनी प्रसार माध्यम क्षेत्रातही येऊन आज या ग्लॅमरस वर्ल्डचा एक हिस्सा व्हावे हेच मी सांगू इच्छिते संयोजकांनी आज ही मुलाखत घेऊन मला भविष्यातील कामांना स्फूर्ती दिली याबद्दल त्यांचेही मनःपूर्वक धन्यवाद व्यक्त करते.
मुलाखतकार – डॉक्टर नंदकुमार मुलमुले.
शब्दांकन – मनीषा कुलकर्णी.