समोरच्याशी अर्थपूर्ण संवाद साधण्याची हातोटी ही प्रयत्नपूर्वक शिकावी लागते आणि त्यावर मनापासून काम करावे लागते. सर्वांनाच अशा संवाद कलेची जन्मजात देणगी मिळते असे नाही. ती कलाही आहे, कारागिरीही आहे आणि त्याचे तंत्रही आहे. ज्योती अंबेकर या उत्स्फूर्त, प्रवाही आणि नैसर्गिक अशा संवादकलेचे चालतेबोलते उदाहरण आहेत. ही कला आणि त्याचे तंत्र कसे आत्मसात करता येईल याविषयी त्या कार्यशाळा घेतात.
जाहीर कार्यक्रमांचे निवेदन कसे असावे, याचा तर त्यांनी वस्तुपाठ घालून दिलेला आहे. शिक्षक, शासकीय कर्मचारी, विद्यार्थी, कॉर्पोरेट क्षेत्रातील मंडळी यांना कार्यक्रमांच्या निवेदनासाठी अनेकवेळा सामोरे जावे लागते. निवेदन कसे करावे, काय करावे, काय करू नये, सहज आणि ओघवते निवेदन कार्यक्रमाचा आलेख कसा उंचावत नेऊ शकते हे त्या उदाहरणांसह आणि प्रात्यक्षिकांसह त्या शिकवतात, चुका दुरुस्त करून आत्मविश्वासाने निवेदन करण्यासाठी तयारी करून घेतात.