सह्याद्री वाहिनीवर त्या गेल्या १२-१३ वर्षे बातम्या देत आहे. संयतपणे प्रेक्षकांना समजेल अशारीतिने त्या बातम्या वाचतात. त्यात कोठेही कृत्रिमता किंवा नाटकीपणा नसतो, म्हणूनच त्यांचे वृत्तनिवेदन लोकांना आवडते. बातम्या वाचणे, कार्यक्रमांचे सूत्रसंचालन करणे, मुलाखती घेणे हा त्यांचा छंद किंवा आवडीचा भाग आहे. मुळात मराठवाड्यातील ग्रामीण भागातून येऊन त्यांनी ‘आवाजा’ च्या क्षेत्रात केवळ मुंबईतच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात स्वतःचे स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. आपल्यातील अंगभूत गुणांना चांगले वळण देऊन आपल्याला पाहिजे त्या गोष्टी साध्य करता येतात, याचे ज्योती अंबेकर या उत्तम उदाहरण आहेत. दूरदर्शनमध्ये सहज म्हणून वृत्तनिवेदकासाठी अर्ज केला आणि त्यांची लेखी परीक्षा, मुलाखत, स्क्रीन टेस्ट अशा रीतसर प्रक्रियेनंतर बारा हजार जणांमधून प्रथम क्रमांकाने निवड झाली. बोलण्याचे आपले कौशल्य अधिक धारदार करण्यासाठी आवाज जोपासना शास्त्राचा अखेरचा शब्द म्हणून ओळखले जाणारे डॉ. अशोक रानडे यांचाकडे ज्योती अंबेकर यांनी शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतले. या प्रशिक्षणच्या शिदोरीवर आणि त्याआधारे भरपूर मेहनत घेउन त्यांनी स्वतःला घडविले आणि ‘निवेदन, सूत्रसंचालन आणि मुलाखत’ या संवाद-कलेच्या प्रांतात त्या एक मानदंड ठरल्या.