वास्तव्य:

मुंबई, अमेरिका, नाशिक

भ्रमणध्वनी:

+91 9869043016

इमेल:

yotiambekar@gmail.com

Published

03/06/2024

No Comments

Join the Conversation

ज्योतीने मला खरोखरच घडवलं आहे. अनेक वेळा मी तिच्या पद्धतीने विचार करण्याचा, वागण्याचा आणि बोलण्याचा प्रयत्न करतो. काही वेळा जमतं, काही वेळा नाही. तिच्यासारखं वेळेच्या बाबतीत पक्का होण्याचा माझा प्रयत्न अजून सुरू आहे.मी खूप माणूसघाणा आणि एकलकोंडा होतो. ज्योतीने माझा हा स्वभाव कमी करण्यासाठी बऱ्याच टॅकटिक्स वापरल्या. आमच्या दोघांमध्ये खरोखरच प्रचंड अंडरस्टँडिंग आहे. प्रशासकीय अधिकारी “अजय अंबेकर” सांगताहेत ज्योती अंबेकर यांच्याविषयी. 

 

त्यावेळी औरंगाबादच्या लोकमतमध्ये आम्हा दहा-बारा परीक्षार्थी तरुण पत्रकारांचा एक उत्साही गट होता. त्यांच्यातील काही जणांच्या बोलण्यात ज्योतीचा उल्लेख असायचा. त्यातल्या दोघांनी विद्यापीठात पत्रकारितेच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेला होता आणि ज्योती विद्यापीठातील वसतिगृहात राहून तोच अभ्यासक्रम करत होती. नोकरीच्या प्रयत्नात ती एक दोन वेळा लोकमतला आली होती. मी रात्रपाळीला असल्याने तिला पाहिलेलं नव्हतं.

बाबा दळवी लोकमतला संपादक होते. अशोक पडबिद्री नुकतेच संपादनासाठी आले होते. ते गप्पीष्ट होते. नोकरीच्या प्रयत्नात असलेली ज्योती त्यांनाही माहित होती. एकदा चारचौघात सहज बोलताना त्यांनी त्यांच्या खास शैलीत ओठातल्या कोपऱ्यात हसून विचारलं, “अरे, तुम्ही ज्योतिषी का लग्न करत नाही ?”

 मी एम. ए. ला अर्थशास्त्र विद्यापीठात बाहेरून नाव नोंदवलं होतं पण क्लासेससाठी विद्यापीठात जायचो. लोकमतमध्ये परीक्षणार्थी असणारा मोहन राठोड विद्यापीठाच्या वस्तीगृहात राहत होता आणि पत्रकारितेचा अभ्यासक्रम करत होता. त्याला मी ज्योती हे काय प्रकरण आहे ते विचारलं पण पडबिद्रींची कमेंट सांगितली. त्याला भयंकर आनंद झाला, त्याने खूप उत्साहाने तिच्याबद्दल सांगितलं.  मी म्हटलं, “ओळख करून दे.” त्यांन एकदम मनावर घेतलं. दुसऱ्या दिवशी मी विद्यापीठात गेलो तो मला मुलींच्या वसतीगृहाकडे घेऊन गेला. ज्योती अगदी घरगुती वेशात आली. सहज भेटल्यागत त्यांन आमची ओळख करून दिली. तिला पाहून चांदणं परसलं वगैरे असं काही झालं नाही पण तिच्यात स्पार्क आहे असं जाणवलं एकदम. भीडरहित थेट बोलणं, प्रसन्न आणि हसतमुख चेहरा.

असेच दोन-तीन दिवस गेले. एकदा रविवारी सकाळी संपादकीय विभागात बसलो होतो. सहज मान वर केली आणि पाहिलं तर दारात ज्योती होती. छान साडी आणि गजरा. थेट पडबिद्री यांच्याकडे गेळो. ते तिला घेऊन संपादकांच्या केबिनमध्ये गेले. मी एकदम सटपटलो. आता ते तिला काय विचारणार ? पंधरा-वीस मिनिटांनी ती बाहेर आली. एकदम तिरमिरीत चेहरा उतरलेला. मोहनला हळूच म्हणाली, बाहेर ये, तो तिच्याबरोबर गेला. मी पडबिद्रींना विचारलं, ते नेहमीच्या मिश्किलित म्हणाले, काही नाही ती तुमच्याशी लग्न करू शकेल का ?  याचा अंदाज घेतला. मी मनातल्या मनात कपाळावर हात मारून घेतला. काही वेळानं मोहन आला तोही गांगरलेला दिसला. म्हणाला, “बरीच अस्वस्थ होती. अस म्हणत होती… मला वाटलं नोकरीसाठी बोलावलं आणि विचारतायेत लग्नाचं…”

संध्याकाळी तिचा लोकमतला माझ्यासाठी फोन आला. अगोदर मला फहिलावर घेतलं. हा काय प्रकार आहे ?  मी तुम्हाला फारशी ओळखत नाही आणि मला डायरेक्ट लग्नाचं विचारतात, मी कशीनुशी समजूत घालण्याचा प्रयत्न केला. (तिच्यासमोर पडतं घेण्याला जी सुरुवात झाली आहे ती तेव्हापासून) मी म्हटलं, तुम्हाला प्रत्यक्ष भेटतो. सविस्तर खुलासा करतो. दुसऱ्या दिवशी काय घडलं त्याचा सविस्तर खुलासा केला. मग माझी  व्यक्तीगत, कौटुंबिक, आर्थिक, शैक्षणिक माहिती, माझे विचार अस सगळं सांगितलं. मग ती ही खुलली. तिनं तिची सर्व माहिती सांगितली. आपण दोघं एकमेकांना आवडू शकतो, असं आमच्या लक्षात आलं.  

एक दोन दिवस असंच आम्ही भेटलो.  लग्न करण्याच्या निर्णयापर्यंत आलो.  नंतर तिसऱ्या दिवशी ती लातूरला गेली. घरच्यांना विश्वासात घेतल्याशिवाय कोणताही निर्णय घेणं तिला योग्य वाटत नव्हतं.

नोंदणी पद्धतीनचं कमी खर्चात (कारण स्वतःच्याच खर्चाने लग्न करण्याचा माझा हट्ट होता) १९८८  या वर्षातला एप्रिलचा महिना. शहरात नुकतीच मोठी दंगल झालेली, अशा वातावरणात औरंगाबाद मधील विवाह निबंधकाच्या समोर आमचं लग्न पार पडलं.

चळवळीतल्या माझ्या अनेक मित्रांच्या लग्नाच्या हकिगतीच्या तुलनेत माझं लग्न प्रकरण अजिबात चित्त थरारक वगैरे नाहीये. खरंच, चित्त थरारक आहे ते लातूरची जिल्हास्तरावर सलग तीन वर्षे अजिंक्य ठरलेली सायकलपटू ज्योती ते मुंबईतील कौशल्य प्राप्त निवेदक आणि सुपरीचित सूत्रसंचालक ज्योती अशा प्रवासाची कथा..

एखादी गोष्ट जमणार नाही असं कोणी डिवचलं की ज्योती पेटून उठते आणि मग असं काही करून दाखवते की डिवचणारा गप्पचं बसतो. कॉलेजमध्ये असल्यापासून तिने नोकरी केली आहे. सुरुवातीला  क्लर्क टायपिस्ट म्हणून पदवी अभ्यासक्रम करत असताना लातूरच्या स्थानिक दैनिकात  अर्धवेळ काम करत होती. तिथे तिला पत्रकारितेचा एक अभ्यासक्रम असतो असं कळालं. तो केल्यावर लवकर नोकरी मिळू शकते या समजुतीपोटी ती औरंगाबादला आली. अभ्यासक्रमानंतर लोकमतमध्ये नोकरी मिळाली. सरकारी नोकरीसाठी माझी निवड झाल्यावर तिने नोकरी सोडली. माझी गोव्यात बदली झाल्यावर तिने गोमंतकमध्ये अर्ज केला. त्यांनी सांगितलं, संपादकीय खात्यात जागा नाहीये तुम्ही प्रूफरीडर म्हणून काम करू शकता. पत्रकारितेची पदवी आणि लोकमतचा संपादकीय कामाचा अनुभव असूनही तुलनेने लहान असलेल्या वृत्तपत्रात प्रूफरीडर म्हणून काम करणं जगाच्या दृष्टीने अपमानास्पद असूनही तिने होकार दिला. चांगलं काम केलं. शिवाय प्रूफरीडरशिपच स्पेशललाईझेशनही शिकली. चंद्रकांत घोरपडे सारखे कडक शिक्षक तिथे संपादक होते. काही महिन्यांतचं तिथं ती उपसंपादक झाली.

गोव्याहून मी साताऱ्याला आलो. दरम्यान भारतीय माहिती सेवेच्या जागेकरता तिने  यूपीएससी अर्ज केला होता. बैठक मारून बसणं, नोट्स काढणं, पाठांतर करणे अशा  घासू अभ्यासगिरी जातीचा तिचा पिंड नाही पण तिने मन लावून अभ्यास केला. जयती त्यावेळी केवळ सहा – सात महिन्यांची असेल. सलग दोन दिवसांचा रेल्वे प्रवास करून दिल्लीच्या कडाक्याच्या थंडीत तिने जयतीला सांभाळत यशस्वीपणे मुलाखत दिली. तिची निवड झाली. पुण्यात पीआयबीत पोस्टिंग मिळालं. मी साताऱ्यात होतो. तिने एकटीने पुन्हा सदाशिव पेठ येथे एक वर्षभर तरी पेइंग गेस्ट ची शिक्षा भोगली. तिच्यासारखी सतत उल्हासित हसतमुख आणि धडपडी बाई वृक्षतेचा शाप मिळालेल्या सरकारी वातावरणात कशी रमेल ही शंका असतानाच तिने तिथलं वातावरण अधिक उत्साही केलं.

मला मुंबईला यावं लागलं आणि पुन्हा तिची फरफड झाली. बाय द वे आमचे जेव्हा केव्हा कशावरूनही वाद होत असतात तेव्हा तू स्वतःहून बदल्या करून घेतल्यास माझी फरपट केलीस मी अलिबागला सुखात होते तू कारण नसताना मला गोव्यात नेलं. गोव्यात स्थिरस्थावर झाले नाही तोवर मला साताऱ्याला यावं लागलं. पुण्यात मी छान बस्तान बसवलं. मग तू मला माझ्या इच्छेविरुद्ध मुंबईत आणलं. अशी तिची टेप ऐकून घेणे क्रमप्राप्त असतं (पुन्हा एकदा बाय द वे आमच्यातही वाद होत असतात पण खरंच हे वाद एक मिनिटही टिकत नाहीत कारण मी लवकर नांगी टाकतो पण कधी कधी ती ही समजूतदारपणे वागते.)

तर तिही माझ्या मागोमाग मुंबईत आली. मुंबईत तिची बदली होऊ शकली. तिथे तिने मन रमवण्याचा प्रयत्न केला पण मग तिला दूरदर्शनचं जग गवसलं. तिथं ती वृत्तविभागात कॅज्युअल म्हणून काम करायला लागली. आधी कॅज्युअल ट्रान्सलेटर, मग कॅज्युअल रिपोर्टर, मग बदली वृत्तसंपादक म्हणून जायला लागली. हे जग तिला आवडायला लागलं. दूरदर्शनवर बातम्या वाचण्यासाठी नावं मागितली होती. तिने कधी ते डोक्यातही आणलं नव्हतं. मी तिला अर्ज करायला सांगितला. मी फारच मागे लागतोय म्हणून तिने अर्ज केला. लेखी परीक्षा, तोंडी परीक्षा, प्रात्यक्षिक परीक्षा असे सारे टप्पे तिने लिलया पार केले. बारा हजार अर्जदारांमधून ती पहिली आली.

आता तिला एकदम जबाबदाऱ्यांची जाणीव झाली. मग तिने जे कसून काम करायला सुरुवात केली की ज्याचं नाव ते.. आवाजाच्या तालमीसाठी तिने डॉ. अशोक रानडे सरांचं रीतसर प्रशिक्षण घेतलं.  अनेक महिने तासंतास आवाजाचे  व्यायाम केले. अजूनही अधून मधून ती ते चित्र विचित्र आवाजाचे व्यायाम करत असते. पूर्ण  बातम्या व्हिसीडीवर रेकॉर्ड करणे, असंख्य वेळा पाहणं, चुका शोधणं,  त्या टाळणं, रंगभूषेचे तंत्र समजावून घेणं, वृत्तपत्रातल्या बातम्या मोठ्याने वाचन. अरे बापरे ! ज्योतीने केलेली मेहनत कोणत्याही  ऍथलेटच्या मेहनतीपेक्षा कमी नव्हती.

पण अंगीकारलेल्या गुणांबरोबरच तिच्यातले अंगभूत गुणही तेवढेच महत्त्वाचे आहेत. एक म्हणजे ती खूप  स्वच्छ, प्रवाही आणि नादमय बोलते. तिचं बोलणं उत्स्फूर्त असतं.

मराठवाड्यातली असूनही तिचे उच्चार प्रमाण उच्चार आहेत. म्हणून ण चा  न किंवा च चा च्छ  असं तिचं कधीच होत नाही. प्रमाण उच्चार सराईत पणे करणे ती कुठे शिकली कोणास ठाऊक. तिसरं तिला कपड्यातलं उत्तम कळतं.

तिच्या आणखी एका गुणाचं मला फार कौतुक वाटतं. तिचं डोकं गणिती आहे आणि तिची स्मरणशक्ती दांडगी आहे. तिला हिशोब पटकन जमतो. (पण तिला हिशोबी वागता येत नाही) एखादी सांगितलेली किंवा वाचलेली गोष्ट, लेख, बातमी, त्याच्यातल्या तपशिलासह तिला पक्की लक्षात राहते. ती त्यातल्या बारकाव्यासह पुन्हा सांगू शकते. त्यात पुन्हा स्वतःचं स्वतंत्र विश्लेषणही ती तेवढ्याच तार्किक पद्धतीने करते.

सूत्रसंचालनात तिला तिच्या या गुणांचा खूप फायदा होतो. उगीचच अलंकारिक, खोटं खोटं, बटबटीत, पाल्हाळी अस ती बोलत नाही. स्वतःचा, वक्त्यांचा आणि श्रोत्यांचा आब राखून हा कार्यक्रम आपण सर्वांचा आहे अशी कार्यक्रमाप्रती आपलेपणाची भावना प्रत्येकात निर्माण  करणं सोपं नाही तिच्या दिलखुलास स्वभावामुळे तिला ते सहज जमतं.

तिच्या आणखी एका गुणाचा मी फॅन आहे. ती एकाचवेळी एखाद्या माणसाशी जेवढ्या मायेने वागू शकते तेवढ्याच कठोरपणे त्याची उलट तपासणी घेऊ शकते. तिच्या पद्धतीने त्याची झाडाझडती घेते. त्यानं ती व्यक्ती सुधारतेचं पण त्याला ज्योतीबद्दल कटुता वाटण्याऐवजी उलट जिव्हाळा वाटायला लागतो. अभ्यास करण्याजोग प्रकरण आहे हे. यात टिकवलेले नातेसंबंध हेही समाविष्ट करावे लागेल. तिच्या सासूचं आणि तिचं नातं हा एक अनोखा प्रकार आहे. सून आपल्या सासूच्या मांडीवर डोकं ठेवून झोपली आहे आणि सासू तिला  थोपटते आहे किंवा सासु सुनेची वेणी घालते आहे किंवा सून सासूला आईच्या ममतेने अग तूग करते आहे किंवा सुनेचं ऐकत जा असं सासू आपल्या मुलाला सांगते आहे असं दृश्य आमच्या घरात पाहायला मिळतं.

मी तर काय तिचा नवरा असल्यामुळे तिच्या आज्ञेत असणारचं पण माझे आई-वडील, तिचे आई-वडील, माझा भाऊ, त्याची बायको, तिचा भाऊ, त्याची बायको, तिच्या बहिणी आणि त्यांचे नवरे सुद्धा तिचं ऐकतात. मला फारच कमाल वाटते त्यांचीसुद्धा.

आमच्या मुलीचं जयतीचं भावविश्व ज्योतीने अशा कौशल्यपूर्ण पद्धतीने समृद्ध केले की ती जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात गेली आणि कोणतीही परिस्थिती ओढवली तरीही आत्मविश्वासाने उभी राहील आणि आनंदी राहील. अनेकदा मुलगी वयात येईपर्यंत तिचं आणि आईचं जमत असतं. मुलगी मोठी झाली की काहीतरी बिनसत असतं आणि त्यांच्यात तणाव निर्माण होतो. असं मी पाहिलय पण ज्योती आणि जयती या दोघी अगदी सख्या मैत्रिणी असल्यासारखं एकमेकींना जपत असतात आणि नेहमी एकत्र आनंदाने इकडे तिकडे बागडत असतात. मी नसलो की त्यांचे स्वतःचे विश्व तयार करतात. ज्याचा मला खूप हेवा वाटतो.

ज्योतीने मला खरोखरच घडवलं आहे. अनेक वेळा मी तिच्या पद्धतीने विचार करण्याचा वागण्याचा आणि बोलण्याचा प्रयत्न करतो. काही वेळा जमतं काही वेळा नाही. तिच्यासारखं वेळेच्या बाबतीत पक्का होण्याचा माझा प्रयत्न अजून सुरू आहे. मी खूप माणूसघाणा आणि एकलकोंडा होतो. ज्योतीने माझा हा स्वभाव कमी करण्यासाठी बऱ्याच टॅकटिक्स वापरल्या. आम्हा दोघांमध्ये खरोखरच प्रचंड अंडरस्टँडिंग आहे. गैरसमज होणं, संशय घेणं, अर्धसत्य सांगणं असं कधीही आमच्याच झालेलं नाही. त्याची आम्ही कल्पनाही करू शकत नाही. कारण आम्ही एकमेकांशी खूप बोलतो. अर्थात ही प्रथा ज्योतीने सुरू केलीये. आम्ही तिघही रोज सायंकाळी किंवा रात्री घरी एकत्र जमलो की आज काय काय घडलं हे सविस्तर सांगतो. प्रत्येकासाठी वेळ देतो. एकमेकांच्या फिरक्या घेतो . नवरा बायकोपेक्षा आम्ही मित्र-मैत्रिणीसारखं जास्त राहतो. माझ्या मित्र-मैत्रिणींमध्ये ती सहजतेने आमच्यातली एक होऊन जाते. तेवढ्या सहजतेने मी तिच्या मित्र-मैत्रिणींमध्ये मिसळू शकत नाही. स्वभावाचा दोष !

व्रतवैकल्य, आहेर- उपचार, नवस, सणावारांचे कर्मकांड अशात ती कधीच गुंतून पडत नाही. ती ज्या वातावरणात वाढली ते मात्र खूपच धार्मिक होतं. मी तर अजिबात धार्मिक नाही पण आमच्यात कधीही या संदर्भात वाद झाले नाहीत किंवा तपशिलात त्यावर बोलणंही झालेलं नाही. तिच्यात सहज बदल होत गेले पण सणावाराचं वातावरण, कुटुंबातल्या सगळ्यांनी एकत्र येणं हे सगळं तिला खूप आवडतं. त्यात ती रमते पण तेवढ्यापुरतचं.. उत्सवातल्या  मंडळीकरणाची तिला हौस आहे. त्यातलं कर्मकांड ती बाजूला ठेवते.

पाच बहिणी एक भाऊ आणि वडील. एकटे कमावते. मालकीचं घर/जमिन काहीही नाही. अशा निम्न मध्यमवर्गीय घरात ती वाढली. घरची शेतीवाडी नाही पण ज्योतीला शेती, पिकं. झाडं, फुलं फळ यांची सखोल माहिती आहे. तिला स्वयंपाक उत्तम जमतो. झटपट, चविष्ट आणि पौष्टिक ही तिच्या सुगरणपणाची वैशिष्ट्य आहेत पण पुन्हा कशाला प्राधान्य द्यायचं हे माहीत असल्याने  स्वयंपाकात ती उगीचच गुंतून पडत नाही. त्याचा अवडंबही माजवत नाही. प्रत्येक गोष्टीत काटेकोर नियोजन करण्याच्या सवयीमुळे ती अनेक गोष्टी एकाच वेळी करू शकते.

मला वाटतं हे लिहिलं आहे तेवढं पुरेस आहे. मराठवाड्यातल्या माणसांना आपल्या बायकोचं खाजगीतही कौतुक करण्याची सवय नाही. जाहीर तर नाहीच नाही. म्हणूनच,  होता होईल तो हातचं  राखून ठेवत लिहिण्याचा मी प्रयत्न केलाय.   –  अजय अंबेकर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

चौकशी करा
चौकशी करा