दूरचित्रवाणी वाहिनीचा अनुभव - चिंतन आदेश - दिवाळी २००९

दूरदर्शनच्या वृत्त विभागामध्ये गेली ८ ते १० वर्षे भाषांतरकार वार्ताहर, वृत्तनिवेदक, वृत्तसंपादक म्हणून काम करीत असताना भारत सरकारच्या एका जबाबदार आणि अत्यंत विश्वासू च्यानेलमध्ये आपण काम करीत आहोत, याचा रास्त अभिमान आणि समाधान मी अनुभवत गेले.

केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे अनेक विभाग आहेत. उदा. पत्रसूचना कार्यालय (बीआयबी), आकाशवाणी, दूरदर्शन, योजना मासिक, प्रकाशन विभाग, क्षेत्रीय प्रचार कार्यालय, सोंग अयांद ड्रामा डिव्हिजन, फिल्म्स डिव्हिजन इत्यादी. युपीएससीची भारतीय माहिती सेवेची परीक्षा पास झाल्यानंतर १७ वर्षांपूर्वी या सेवेत मी दाखल झाले.

करिअर करण्याचं खूळ माझ्या डोक्यात कधीच नव्हतं. एक उत्तम गृहिणी होणं आणि चांगली आई होणं हे स्वप्न मात्र मी अगदी कॉलेजमध्ये असल्यापासून पाहिलं होतं. पदवी शिक्षणानंतर पत्रकारितेचा डिग्री कोर्स पूर्ण केल्यानंतर अगदी सहजच्ग दैनिक लोकमतमध्ये उपसंपादक म्हणून आणि औरंगाबाद आकाशवाणी केंद्रात कॅज्युअल आर्टिस्ट म्हणून काम करू लागले. त्या नंतर लग्न, मूलबाळ या व्यापात रमले आणि सहजच स्वःताला तपासून बघण्यासाठी म्हणून युपीएससीची परीक्षा दिली आणि त्यात उत्तीर्ण झाले. ही सर्व्हीस आपण जॉईन करायची नाही हे मनाशी पक्कं ठरवलं होतं (कारण करिअर करायचंच नव्हतं ना!)

पण माझे पती अजय अंबेकर यांचं म्हणणं असं पडलं की, 'तुझ्या घरात सगळे शिकलेले आहेत. करीअर करीत आहेत, तूही चांगलं शिक्षण घेतलं आहेस, आपली मुलगी बघता बघता मोठी होईल आणि त्यानंतर मात्र तुला वेळ खायला उठेल. सगळी बहीण- भावंड आणि मैत्रिणी पुढे गेल्या, आपण मात्र काहीच करू शकलो नाही, याचं दुःखं उराशी बाळगून तू निराशेत पुढचे दिवस काढशील कारण तेव्हा वय वाढलेलं असेल आणि वेळही हातातून निघून गेलेली असेल. तेव्हा हातात आलेल्या संधीचा शांतपणे विचार कर आणि मगच काय तो निर्णय घे. तडकाफडकी निर्णय घेऊ नको.' असा सल्ला त्यांनी मला दिला. त्यांचं म्हणणं मला पटत होतं, पण मन आतून तयार होत नव्हतं.

अशाच अवस्थेत पुणे पीआयबीत रुजू झाले. त्यानंतर मुंबई पीआयबीतून अल्पावधीतच दूरदर्शनमध्ये वृत्तविभागात वृत्तनिवेदक आणि वृत्तसंपादक म्हणून रुजू झाले.

ईलेक्ट्रॉनिक मिडियात काम करीत असताना क्यामेरामन, टेक्निशियन्स, व्हिडीओ एडिटर्स, भाषांतरकार, वार्ताहर, स्टिंगर्स, प्रोड्युसर, आपल्यासोबतचे इतर सहकारी यांना सगळ्यांसोबत घेत ‘टीमवर्क’ म्हणून काम कराव लागतं. घड्याळाच्या काट्याकडे बघत वेळेची कसरत करावी लागते. आता इतके च्यानेल्स आलेले आहेत तरी दूरदर्शनच्या सातच्या आणि साडेनऊच्या बातम्यांची व्हिवरशिप खूप मोठी आहे, हे कोणीही नाकारणार नाही. विश्वासार्हता ही दूरदर्शनची मोठी ताकद आहे. कुठलीही बातमी देताना सगळ्या बाजूंचा विचार करून बातमी लोकांसमोर गेली तर टे सर्वांच्या दृष्टीने योग्य असत, याचं भान मी तिथे असताना कायम राखत गेले.

शिफटमधल्या ड्यूटीज, शनिवार- रविवार, पब्लिक हॉलिडे नो छुट्टी, रिपोर्टिंगसाठीही अनेक वेळा बाहेरगांवी जात राहणं यातून आपणही खूप शिकत जातो, हे लक्षात येत गेलं. बातम्यांच्या निमित्ताने सागळया क्षेत्रातल्या लोकांशी विचारविनिमय करायला मिळणं , हा एक माझ्या दृष्टीनं आनंदाचा ठेवा ठरला. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. विजय भाटकर , शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे , आशाताई भोसले, श्रेयस तळपदे, मंगेश पाडगांवकर, सुप्रिया सुळे, सुशीलकुमार शिंदे, विलासराव देशमुख, अशोकराव चव्हाण, रामदास आठवले, गोपीनाथ मुंडे, नितीन गडकरी , रामदास कदम अशा अनेक दिग्गजांशी मुलाखतीच्या निमित्ताने विचारविनिमय करता आला, हे भाग्य मला केवळ दूरदर्शनमुळेच मिळू शकलं , हे नम्रपणे मान्य करावं लागेल.

'दूरदर्शन हे शासकीय माध्यम असल्यामुळे तुम्हाला दबावाखाली काम करावं लागतं का हो?' अशी विचारणा अनेक वेळा झाली होती. मात्र मी अभिमानाने सांगू शकते के, असा कुठलाही दबाव माझ्यावर कधीही आला नाही. अर्थात दूरदर्शनच्या वृत्त विभागाच्या प्रमुख श्रीमती मोनिदिपा मुखर्जी यांनी माझ्यावर टाकलेला विश्वास आणि काम करण्याकरीता दिलेलं स्वातंत्र्य याचं मोलही खूप मोठं आहे. सरकारी यंत्रणेत ही बाब खूप अभावानंच आढळून येते. या यंत्रणेत जबाबदारी टाकली जाते, पण अधिकार बऱ्याच वेळा दिले जात नाहीत, पण इथे मात्र त्यां जबाबदारीही टाकायच्या आणि निर्णयाचे स्वातंत्र्यही द्यायच्या, त्यामुळे काम केल्याचं समाधान मिळत गेलं.

दूरचित्रवाणी वाहिनीत काम करीत असताना प्रचंड ताणाला सामोरं जावं लागतं. हरघडी युद्धाला तोंड देण्याची तयारी ठेवावी लागते. कारण लाखो लोक ते पाहत असतात. त्यातील छोटीशी देखील चूक महागात पडू शकते याचं सतत भान ठेवावं लागतं.

मी दूरदर्शनमध्ये काम करत असताना इतर दूरचित्रवाणी वाहिन्यांमध्ये माझ्या ओळखीचे संपादक, वृत्तसंपादक, वृत्तनिवेदक, वार्ताहर यांच्याशी भरपूर गप्पा व्हायच्या. त्यात मुख्य विषय असायचा ‘कामाचा ताण’ आणि ‘आरोग्य’. पण तरीही आपल्या कामासंदर्भात लोकांकडून जेव्हा चांगला ‘फीडब्याक’ मिळायला लागतो, तेव्हा मोठं समाधान मिळतं आणि ताणतणाव क्षणात गायब होतात, नवीन काम करण्यास उभारी मिळते, आई हीच या क्षेत्राची मोठी ताकद आहे असे मला वाटते.

छोट्यांपासून मोठ्या लोकांपर्यंत सतत संपर्कात राहणं, त्यांच्याशी हितगुज करणं, नवे प्रवाह जाणून घेणं , स्वःताला अपडेट करणं ही पण या व्यवसायाकडून मिळालेली देणगीच आहे असे म्हटले पाहिजे.

हे दृकश्राव्य माध्यम असल्यामुळे तुमची वाणी आणि तुमचं व्यक्तिमत्त्व फुलवण्यासाठी हे माध्यम अतिशय उपयुक्त ठरत हे मला व्यक्तिशः जाणवलं. या माध्यमाची ताकद खूप मोठी आहे. आपण त्याला जेवढ देतो त्यापेक्षा कितीतरी अधिक ते आपल्याला देत असत, हे मी जाता जाता नमूद करू इच्छिते.