इगो-फिगो टळो! आनंद-राज्य येवो! - चिंतन आदेश - दिवाळी २०११

स्वतःच्याच प्रेमात पडलेली किंवा स्वतःचंच म्हणणं खरं असणाऱ्या (करणाऱ्या नव्हे) समजुतीत वागणारी व्यक्ती ओळखण्याची एक सोपी युक्ती आहे. ही युक्ती आपण स्वतःसाठीही उपयोगात आणू शकतो. असं करायचं, त्यां व्यक्तीच्या किंवा आपल्या बोलण्यात (अर्थात लिहिण्यातसुद्धा) कितीवेळा ‘मी’,’माझे’,’मला’ हे शब्द येतात ते मोजायचं. दहा वाक्यांत दहापेक्षा जास्त वेळा हे शब्द आले तर केस गंभीर आहे, असं समाजाव. दहापेक्षा कमी पण पाचपेक्षा जास्त वेळा हे शब्द वापरले गेले तर सुधारणेला वाव आहे आणि तीन ते पाचवेळा ‘मी-मी’ करणाऱ्यांनी पुढे धोका आहे, हे समजून सावध व्हावं. एक ते दोनवेळा ‘माझं’ किंवा ‘मला-मला’ करणाऱ्यांनी ही सवय जेवढी कमी करता येईल तेवढे चांगलं हे लक्षात घ्यावं.

‘माझ्या’ या अनुमानाला कोणताही शास्त्रीय आधार नाही, हे ‘मी’ अगोदरच स्पष्ट करते. ‘माझ्या’ सहज निरीक्षणातून मला गवसलेलं हे ‘माझं’ साध-सोपं सूत्र आहे. (बापरे! हे ‘मी’ काय लिहून बसले, ‘माझ्याकडून’ हे खरंच अनाहूतपणे लिहून झालंय. ‘मी’पणाची ‘माझी’ कसोटी ‘मलाच’ लावण्यासाठी लगेच शब्द मोजू नका.)

‘स्वानुभव सांगताना प्रथम पुरुषी एकवचनी उल्लेख वारंवार होणं आपण समजू शकतो. पण कारण नसताना मीपणाचं पालुपद लावणं मनाला पटत नाही.’ आता हेच बघा ना, हे आत्ताचं वाक्य जर असं लिहिलं गेलं असतं. ‘मी जर माझा स्वःताचा अनुभव सांगत असेल तर प्रथम पुरुषी एकवचनी उल्लेख वारंवार होणं मी समजू शकते. पण कारण नसताना मीपणाचं पालुपद लावणं काही माझ्या मनाला पटत नाही.’ किती फरक पडतो? आलं लक्षात?

स्वतःवरच अतोनात प्रेम करणाऱ्या व्यक्ती सुप्त अहंकारी असतात असं कां समजू नये? अहंपाणाची बाधा झाली की वर्तनात आणि म्हणून वाणीत वारंवार स्व डोकावतो. पण एक महत्वाचं बोलण्यात मीपणा अजिबात न आणता वर्तनात ‘मी’पणाचा ठसा उमटवायला खूप कौशल्य लागतं. अशी मंडळी आपल्या आजूबाजूला कमी नसतील. बोलण्यात आणि वागण्यात ‘अहं ब्रह्मास्मि’ व्यक्त करणाऱ्याचा उल्लेख लेखात यापुढे ‘अहं’ असा करुया! याचा आणखी फायदा असा की, ‘अहं’चा अर्थ ‘मी’ असा असल्यानं आपण स्वःताला जोखून बघू या!

तर, अशा ‘अहं’ माणसांना (‘माणूस’ मध्ये पुरुष आणि बायका दोन्ही समाविष्ट) लोक बरोबर जोखून असतात. घरी, दारि आणि कचेरीत थोडीफार सत्ता असेल तर अशांना तेवढ्यापुरती किंमत मिळते. पण काहीच नसताना अहंगिरी करणाऱ्याची फक्त चेष्ठाच होत असते. अशा माणसांमुळे समाजाचं काहीच बिघडत नाही. झालंच तर तर त्यां माणसाचं स्वतःचंच नुकसान होऊ शकतं. तेही हरकत नाही. पण ‘अहं’ व्यक्तींमुळे त्याच्या कुटुंबाचे तीन तेरा होऊ शकतात. हे जास्त चिंताजनक आहे.

अहंबाधेचा कडेलोट झालं की, त्यां माणसाची भावनिक, मानसिक,आर्थिक आणि सामाजिक स्तरावर पीछेहाट होण्यास सुरुवात होते. अशी व्यक्ती घरातली करती असेल तर सारं घर त्या व्यक्तीभोवती फिरत. शिस्तीच्या नावाखाली ते खपूनही जातं. पण हीच व्यक्ती घरातल्या लोकांचं विचारस्वातंत्र्य नाकारू लागली, त्यांच्या व्यक्तिमत्व विकासात अडसर ठरू लागली किंवा भावनिक धमकी देऊन स्वःताचा अहं जोपासू लागली, तर असं घर फार काळ एकसंध राहू शकत नाही. राहिलं तरीही जुलामाच्या रामरामाचा शेवट शेवट कोणालाच सुखकारक नसतो.

प्रत्येकाला त्याचं घर हे सर्व दृष्टींनी विश्रांतीस्थान असतं , जिथे आपण आपल्या भावना मनमोकळेपणाने अगदी हक्कांने व्यक्त करू शकतो. अशा ह्या घरात एखाद्याची मानसिक, भावनिक घुसमट वारंवार होऊ लागली तर ती व्यक्ती नैराश्यात जाते आणि पर्यायाने सगळ्या घराची जगण्याची लय बिघडून जाते. वेळीच उपाय झाले नाहीत तर घर मोडेपर्यंत मजल जाऊ शकते.

ही बाधा फक्त मध्यमवर्गीय सर्वसामान्य घराच्या शांतीला हादरा देते असं नाही तर उद्योग-व्यवसाय, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या घरांची शकलंही, ही ‘अहंबाधा’ झाली कि होतात. केवळ मालमत्तेची वाटणी किंवा वैचारिक मतभेद हे दोन भावांच्या वैराचे कारण नसते. दाबून ठेवलेला सुप्त गंड उघड रूप घेतो. त्यामुळे काय होतं हे दाखवणारी उदाहरणं जगजाहीर आहेत. आर्थिक किंवा राजकीय महत्वाकांक्षा या गोष्टीही घरे विभागली जाण्यास कारण ठरतात. अर्थात एकाच अनेक कर्तबगार व्यक्ती असताना एकाच्याच विचाराने निर्णय होणे अवघड असते. प्रत्येकाला आपल्या कल्पनेनुसार, इच्छेनुसार जगावे असे वाटत असते. प्रश्न येतो तो कोणाचा शब्द अखेरचा मानायचा याचा!

समजात वावरत असताना आपल्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाकडून नक्कीच काहीतरी शिकण्यासारखं असतं. आपण संवेदनशील असू तर स्वःताला त्यातून घडवत असतो. पण संवेदनशीलतेबरोबर इगोही झाडता आला पाहिजे तरच स्वताःमध्ये चांगलं काही जिरवण्याची पुढची पायरी आपण गाठू शकतो. पण प्रश्न मुळातच आपली पायरी इतरांपेक्षा वरची असल्याचा आपला गैरसमज अगदी ठाम असेल तर! वरिष्ठ – कनिष्ठतेची भावना केवळ जात,धर्म,संपत्ती,रंग-रूप,हुशारी किंवा अधिकार यासंधार्भातच जोपासली जाते असं नाही. श्रेष्ठत्व बाळगण्यासारखे कोणतेही कथित गुण नसतानाही अनेक जन अहंकाराचा टेंभा जनात आणि मनातही कशाच्या जोरावर मिरवत असतात असा प्रश्न अनेकदा तुम्हालाही पडला असेल.

‘अहं’ वाली मंडळी काम करण्यातला शुद्ध आनंद घेण्याचंच विसरून जातात. मग अशी माणसं कथित यशासाठी आयुष्यभर झगडतात. त्यातले काही परिस्थितीने साथ दिल्यानं यशाच्या शिखरावर पोहचली तरीही आयुष्याच्या निर्णायक वळणावर मात्र मानसिकदृष्ट्या कोलमडून पडतात. अशावेळी जवळची म्हणवणारी माणसं दूर गेलेली असतात. कारण दूर गेलेल्या माणसांना काही प्रमाणात कां असेना ‘अहं’ असू शकतो.

स्वाभिमानाच्या बुरख्याखाली ‘अहं’पणा जोपासणारेही अनेक असतात. ‘स्वाभिमानी’ असायला हरकत नाही पण कशाचा गर्व असणं किंवा अहंकार असणं वैत’ अशी आपल्याला दिली जाणारी शिकवण! पण या तिन्हीतही काय नेमकी सीमारेषा आहे, हे मात्र सांगितलं जात नाही. उगीचच शब्दच्छल करायाचा आणि श्रेष्ठत्व बाळगण्याला वाट करून द्यायची! स्वाभिमान तरी कशाचा बाळगायचा आणि कशाचा बाळगायचा? ‘मी अमूक अमूक आहे, याचा मला स्वाभिमान आहे.’ असं म्हटलं की ‘अहं’चा हलका कां असेना वारा चिकटतोच. कारण ‘ आपण इतरांपेक्षा केवळ वेगळे नाही तर थोड्या वरच्याच इयत्तेचे आहोत’ असा संदेश अशा स्वाभिमानी वृत्तीतून दिला जातो. त्यापेक्षा ‘ मी अमूक अमूक आहे, याचा मला आनंद वाटतो’ अशा प्रकारची आपली भावना व्यक्त झाली तर विश्वासाचं आणि म्हणूनच आनंदाचं वातावरण तयार होईल.

‘इडा-पिडा टळो! बळीराज्य येवो’ या ऐवजी ‘इगो-फिगो टळो! अहं-राज्य बुडो!’ असं म्हटलं पाहिजे थोडक्यात,

गर्वाने छाती फुगली असेल तर तिला पिन लागो!
हातात कशाचा टेंभा असेल तर तो लगेचच गळून पडो!
स्वाभिमानऐवजी ‘आनंद-राज्य’ येवो! ही इच्छा!