नात्यातील समृद्धी हे आयुष्य - चिंतन आदेश - दिवाळी २०१३

‘चिंतन आदेश’ च्या दिवाळी अंकाचे विषय नेहमीच मनाला स्पर्शून जाणारे असतात. मी नियमितपणे या दिवाळी अंकासाठी लिखाण करण्यामागे कदाचित ते प्रमुख कारण असाव. बोलण्याच्या क्षेत्रात काम करणं म्हणजे मुलाखत घेणं, सूत्रसंचालन करणं , टी.व्ही., रेडीओसाठी बातम्या वाचणं किंवा वेगवेगळ्या विषयांवर व्याखानं देणं अथवा वेगवेगळी वर्कशोप्स घेणं ही माझी आवड आणि व्यवसाय आहे. आकाशावाणीसाठी वृत्तसंपादक म्हणून काम करताना दुसऱ्यांनी लिहिलेल्या मजकुरात गरज पडलीच तर काटछाट करणं एवढ्यापुरतं नियमित लिखाण. लिखाणाचा मला लहानपणापासूनच अतिशय कंटाळा; पण ‘चिंतन आदेश’ च्या टीमकडून घेतल्या जाणाऱ्या ‘फोलोंअप’ ला तोड नाही. ही मंडळी मानगुटीवर बसून लिहून घेतल्याशिवाय सोडत नाहीत. यंदाचा विषय ‘नातीगोती’. हा अर्थच मनाला भावणारा. याबाबत लिहायला माझ्याकडे खरच एक कथा आहे. ती अशी....

आणि विचारचक्र सुरू झालं

परदेशी शिक्षणासाठी जाणाऱ्या मुलांच्या बाबतीत कौतुकानं लिहिण्या-सांगण्यासारखं आता वेगळं असं काहीच नसतं, इतकं ते कॉमन झालं आहे; पण मागच्या वर्षीच माझ्या मुलीने या संदर्भात प्रयत्न करायचं ठरवल्यावर माझं विचारचक्र सुरू झालं. बी.ई. कॉम्प्युटरला सायन्सची डिग्री पदरात पडल्यानंतर तिला ‘डिझायनिंगमध्ये’ मास्टर्स करायची इच्छा होती, तेही जगातल्या टोप- २० पैकी एखाद्या विद्यापीठात. तिचं स्वप्न आणि महत्वाकांक्षा ऐकून मी दचकले.

स्वतःवरचा विश्वास आणि जिद्द

भारतात तिला एनआयडी, अहमदाबाद किंवा एसआयडी, आयआयटी पवई मिळालं तर चालणारं होतं. बाकी ठिकाणी शिकायला जायची तिची तयारी नव्हती. वरच्या दोन्ही संस्थांमध्ये अतिशय मर्यादित जागा आहेत. त्या मानानं तिथे जाण्यासाठी स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांची संख्या लाखोंच्या घरात असते. या दोन्हीही ठिकाणी तिला सीट मिळाली नाही. पण तिचा स्वतःवर ठाम विश्वास होता. ती म्हणाली, “आई, जगभरातल्या इतर डिझायनिंग इन्स्टिट्यूट मध्ये सर्वोत्तम ठिकाणी मला निश्चित प्रवेश मिळेल. नाहीतर मी परत पुढच्या वर्षी प्रयत्न करेन.” मधल्या काळात तिने एका मोठ्या मल्टीन्याशनल कंपनीमध्ये पाच आकडी प्याकेजाचा जॉब हातात घेऊन ठेवला होता. बी.ई. ची डिग्री हातात पडण्याधी जॉब मिळाला होता. पण गेली काही वर्षे ती क्रिएटीव्ह फिल्डमध्ये जाण्यासाठी जीवापाड झटत होती. यातूनच जीआरई टोफेलच्या परीक्षेत अतिशय सुरेख मार्क तिने मिळवले. तिचे प्रयत्न, तिचे कष्ट , जिद्द मी जवळून अनुभवत होते. या सगळ्या गोष्टीला यश आलं आणि जगातल्या पहिल्या पंधरा विद्यापीठांपैकी एक मानल्या गेलेल्या न्युयोर्क युनिवर्सिटीत ‘टीश’ स्कूल ऑफ आर्टस मध्ये तिला प्रवेश मिळाला. जिथे ‘अंजीलीना जोली’ किंवा ‘लाईफ ऑफ पाय’ चा दिग्दर्शक शिकला. अशा ठिकाणी टी थेट जावून थडकली. विशेष म्हणजे तिला २१ लाख रुपयांची स्कॉलरशिप देखील मिळाली.

आणि एक वेगळा अनुभव

हे एवढं सगळं सांगण्याचं प्रयोजन म्हणजे, एकुलती एक मुलगी आता अमेरिकेला जाणार, कदाचित परत येणार नाही, ही सहसा प्रत्येक आईला वाटणारी धास्ती मला वाटली नाही. हे सगळं मिळवण्यासाठी त्या मुलीने जी काय मेहनत घेतली, त्या मेहनतीला माझा सलाम होता. स्वतःचं करिअर घडवताना एखाद्या स्त्रीला किती अडचणीना सामोरं जावं लागतं याची मला स्वतःला कल्पना आहे. त्यामुळे ती ज्या दिवशी अमेरिकेला गेली त्या दिवशी मी न रडता हसत हसत टाटा केला आणि इतरांनाही रडू दिलं नाही. आनंदाने घरी आले आणि एरवी आठ तास गाढ झोपणारी मी त्या दिवशी सलग ११ तास गाढ झोपून गेले. तिला हव ते मिळवण्यासाठी ती जी काही धडपड करत होती, त्यात मीही खूप गुंतून गेले होते. या सगळ्याचं एक वर्तुळ पूर्ण झाल्याची भावना मनात होती आणि चेहऱ्यावर समाधान आणि तृप्ती होती. मी स्वतः अतिशय लहान गावातून आलेली स्त्री. माझी मुलगी एवढी गरुड भरारी घेईल हे मी कधी स्वप्नातही पाहिलं नव्हतं

आणि आठवली गरुडाची गोष्ट

विमानतळावरही मला गरुड पक्ष्याची डिस्कव्हरी च्यानेल वरची पाहिलेली फिल्म आठवत होती. गरुड पक्षीण तिचं पिल्लू मोठं झालं की , योग्य वेळ पाहून त्याला घरट्यातून जोरात ढकलून देते, तेव्हा तिच्या मनात खूप कालवाकालव होत असते. पिल्लाला ढकलण्यापूर्वी ती त्या डोंगरकपारीतल्या तिच्या घरात खूप येरझाऱ्या घालते. तिच्या मनात चिंता असते. आता पिल्लाला ढकलल्यावर ते नीट उडलं तर ठीक आहे नाहीतर खोल दरीत कोसळून मरण पावणार; पण उडलं तर उउंच भरारी घ्यायला शिकणार. इथं माझ्या मुलीच्या मनात कसलीही चलबिचल नव्हती. ती गतीनं उडण्याच्या तयारीत आधीपासूनच बसली आहे हे पाहून त्या गरुड पक्ष्यासारखी माझी घालमेल वगैरे काही झाली नाही. मला असं वाटलं, ‘आई’ म्हणून माझी तपश्चर्या फळाला आली.

आणि इतरांचं कौन्सीलिंग सुरु

दुसऱ्या दिवसापासून बिल्डींगमधले शेजारी – पाजारी, ओळखीचे, ऑफिसमधले सहकारी ‘ जयंती तुला सोडून दूर गेली, करामत नसेल ना?’ असं विचारायला लागली; पण मी सगळ्यांना प्रामाणिकपणे सांगितलं की , ‘नाही मला खूप छान करमतय. मी खूप खूष आणि आनंदात आहे.’ अनेक गोंधळलेली तरुण मुलं-मुली मी रोज पाहत आली आहे. त्यांना कशात करियर करावं, हेच खूप काळ कळत नाही. त्यामुळे त्यांचे आई-वडीलही चीन्तते पडलेले असतात. या सगळ्यातून माझी सुटका झाली, याचाच मला आनंद होता. मग मी ठरवलं, तिच्यासोबत ज्या इतर मुली,मुलं गेले आहेत, त्यांच्यासाठी रडणाऱ्या आई-वडिलांचं कौन्सीलिंग करायचं. आजच्या घडीला त्यात मला बऱ्यापैकी यश मिळालं आहे.

आणि नातं म्हणजे काय?

नातं म्हणजे काय हो? एकमेकांच्या आवडी-निवडींचा, विचारांचा आदर राखत एकमेकांच्या स्पेसवर अतिक्रमण न करता कुटुंबातल्या प्रत्येकाला त्याच्या कलाप्रमाणे जगू देणं, आनंद शोधू देणं म्हणजे नातं.

आणि नातं परिपक्व झालं

हे फक्त कुटुंबापुरतच नाही तर इतरही ठिकाणी हेच एप्लीकेबल आहे, असं मला वाटतं. इतरांच्या नको त्या गोष्टीत नाक न खुपसता, अनावश्यक चौकशा न करता त्यांचं व्यक्तीस्वातंत्र्य जपणं खूप गरजेच असत. नात्यात या गोष्टींचा संकोच होताना दिसतो आणि अनेकदा अनेक जण तंगड्यात तंगड्या घालून पडताना दिसतात. एकत्र कुटुंब असो नाहीतर विभक्त. कुठलाही व्यक्तीस्वातंत्र्य, विचारस्वातंत्र्याचा संकोच झालां की नात्याचं ओझं वाटायला लागतं. या नात्यात आई-मुलीने आणि बाबानं प्रत्येकाच्या व्यक्तीगत स्पेसवर अतिक्रमण करायचं नाही. प्रत्येकाला त्याच्या कलानं फुलू द्यायचं हे ठरल्यामुळे नात्याचं ओझं, अपेक्षांचं ओझं निर्माण झालं नाही.

नात्यातील समृद्धी हेच संचित

पृथ्वीच्या कुठल्याही भागात गेलो तरी कोणतीही नाती टिकवायची असतील, समृद्ध करायची असतील तर आपल्या अपेक्षांचं,स्वप्नांचं ओझं इतरांवर लादलं नाही की कुठलही नातं परिपक्व समृद्ध होतं आणि दीर्घ टिकतं हे मला या वरच्या कथेतून शिकायला मिळालं आणि ही बाब आता मी विनासंकोच सगळ्यांना सांगत आहे. सुरुवातीला अनेकांना माझ्या बोलण्यची गंमत वाटत होती. एकुलती एक मुलगी एवढ्या दूर गेल्यानंतर ही आई सांगते की, सुखाने झोपते. उलट जास्त आनंदी आहे , तेही अनेकांना खोटे वाटत होते; पण आता त्यांनाही टे हळूहळू पटायला लागलं आहे. नात्यातील ही समृद्धी हेच आपलं आयुष्याचं संचित आहे. यावर संपूर्ण विश्वास ठेवून जीवनाची वाटचाल करणारी मी आहे, एवढंच मी या लेखाच्या निमित्ताने सांगेन.

आणि गाणं आठवलं

या निमित्ताने एका गाण्याची आठवण झाली. ‘आकाशी झेप घे रे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा. तुज पंख दिले देवाने, कर विहार सामर्थ्याने , जरी डोंगरी हिरवी राने...’ आपलं घर आणि घरातली माणसं कितीही उबदार वाटत असली तरी स्वतःचं आयुष्य स्वतः उत्तमपणे घडवण्याची आस प्रत्येकात असणं गरजेचं आहे. त्याने जगणं अधिक सुंदर आणि सुलभ बनत जातं.

तंत्रज्ञानामुळे जगणं सुलभ

जागतिकीकरणानंतर आता जग किती जवळ आली आहे, याचा प्रत्यय या विषयावर लिहिताना सतत येतोय. एन्द्रोईद फोन, वोट्सआप, फेसबुक, ई-मेल ,वेबकॅम , व्हिडीओ फोनकॉल्स आणि दूरध्वनी अर्थात मोबाईल फोनमुळे म्हणावा तसा दुरावा जाणवत नाही. मनात आलं की, कधीही संपर्क साधा आणि निवांत हवं व्यक्त व्हा. माझ्या आईची, सासुबाईंची आठवण आली की मी जसं रात्रीचा प्रवास करून सकाळी औरंगाबाद किंवा नांदेडला पोहचते, तितक्याच सहज रा\त्री मुंबईतून बसलं की दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत न्युयोर्कला पोहचता येत. इतकं सोपं झालं आहे, तिचं येणं किंवा आपलं जाणं. नातं पोषक व्हायला हे सगळं उपयुक्त ठरतंय असंच वाटायला लागतं.