यु हॅव युवर ओन फ्युचर - महाराष्ट्र टाइम्स - २ डिसेंबर २०१०

एम्टी नेस्टच्या प्रॉब्लेमला तोंड देण्यासाठी दूर जाणारी मुलंच आई-बाबांची त्यासाठी तयार करण्याइतकी मॅच्युअर झाली आहेत...
ही गोष्ट अशाच एका लेकीची, तिच्या आईला 'मोठं' करणारी.


ती जायला निघणार होती त्या दिवशी सकाळीच तिच्या रूममधलं सगळ सामान हॉलमधे सुटकेसबंद झालं होतं. सकाळची धावपळ सुरू होती. तिचे आजी-आजोबाही गावाकडून आले होते. घरात काम करणाऱ्या ताईची जयतीसाठी आवडणारे पदार्थ बनवण्याची लगबग सुरू होती आणि माझ्या डोळ्याच्या धारा थांबत नव्हत्या.

एरवी मी एवढी स्वत:ला कणखर समजणारी, दिवसाचा बहुतेक वेळ बाहेर वावरणारी बिझी आई, प्रसंगी एवढी भावनाशाली होऊ शकते तर, घरी राहणाऱ्या आईची अवस्था कशी होत असेल, हा प्रश्न विजेसारखा माझ्यासमोर चमकून गेला.

सकाळच्या या धावपळीत दाराची बेल वाजली. डोळे पुसतच दार उघडलं. एका नामांकित दैनिकाची पत्रकार, माझी मैत्रीण दारात उभी होती. माझ्याच वयाची आणि धाकट्या बहिणीसारखी. तिला पाहताच माझा बांध पुन्हा फुटला आणि मी तिच्या गळ्यात पडून ओक्साबोक्सी रडू लागले. काय झालंय हे न कळल्याने ती गांगरून गेली. तिला खुणावत, आत ये, असं म्हणत रडतच होते. मुलगी आईला सोडून एवढ्या दूर जात असताना काय यातना होतात, ते बघा, तुम्ही पण आई आहात. थोड्या दिवसांनी तुम्हालाही अशा प्रसंगाला सामोरं जायचं आहे. कसं स्वत:ला सावरायचं, तुम्हीच सांगा आणि माझं रडणं सुरूच राहिलं. तिने मला पोटभर रडू दिलं. आजी-आजोबा कावरेबावरे होऊन बघतच राहिले. एरवी धिराने वागणारी आपली सून आज एकाएकी इतकी कशी हळवी बनली, याचं कोडं त्यांनाही उलगडत नव्हतं.

थोडी शांत झाल्यावर, थोड्या गप्पा मारून हिरमुसल्या वातावरणात मैत्रीण निघून गेल्यानंतर जयतीने मला आईच्या ममतेने जवळ घेतलं. त्या क्षणी तीच माझी आई झाली होती! 'आई मी तुझं दु:ख समजून शकते पण मला जायला हवं, पुढे शिकायला हवं, तू असं रडून कसं चालेल?' तिच्या प्रश्नाला उत्तर देत मी म्हणाले, 'छकुली सगळं कळतंय गंं मला, पण वळत नाही हे खरं, कालपर्यंत तू माझ्या कुशीत झोपत होतीस. उठल्यापासून झोपेपर्यंत मी सदोदित तुझ्या विचारात असायची. भलेही मी ऑफिसात असेन की बाहेरगावी. डोक्यात कायम तुझ्या वेळापत्रकाचं गणित जमवणं सुरू असायचं. तूच तर म्हणायचीस ना, आई या दिवशी सुट्टी घे, त्या दिवशी सुट्टी घे, आज लवकर ये, उद्या उशिरा जा, माझ्या परीक्षेसाठी दोन महिने सुट्टी घे, फोन करूनही भंडावून सोडायचीस. ऑफिसमधे बातम्यांच्या गडबडीत अकडलेली असताना ऐन पावणेसातच्या मुहूर्तावर फोन करून विचारायचीस 'आई ही भाजी आवडली नाही, आता काय करू?', 'आई माझी ब्लॅक कलरची जिन्स पॅण्ट सापडत नाही, कुठे गेली?', 'आई तू लवकर ये आपण सी-फेसवर फिरायला जाऊ.' हा सगळा व्हॅक्युम मी कसा भरून काढणार?..

नुकतंच अठरावं लागलेली माझी मुलगी घरातून बाहेर पडताना रडणाऱ्या आईला शांतपणे धीर देत होती, 'ग्रो अप ममा. ग्रो अप. आय एम नॉट युअर फ्युचर, यु हॅव युवर ओन फ्युचर'... मी एकदम स्तब्ध झाले. बराच वेळ. मी 'ग्रो अप' व्हावं हे तिचं म्हणणं बरोबर होतं. ती आता मोठी झाली आहे. तिच्या पंखात बळ आलेलं आहे. पिल्लू आता घरट्यातून उडू पाहत आहे आणि मी तिला कशी अडवणार होते? तिच्यात हे बळ यावं म्हणून तर इतकी वर्षं आई म्हणून आनंदाने झटत राहिले आणि मनोमन समाधानीही होत राहिले. असा एखादा दिवस इतक्या कमी काळात माझ्या समोर येऊन उभा ठाकेल याचा मी कधी विचारच केला नव्हता.

ती बारावीत शिकत असताना, पुढच्या वषीर् जिथे कुठे अॅडमिशन मिळेल तिथे ती जाणार. आपल्याला तिच्याशिवायही आनंदाने राहायला शिकलं पाहिजे याची जुळवाजुळव मनात वर्षभर करतच होते. पण प्रत्यक्षात ती दूर राजस्थानात जाणार हे निश्चित झाल्यावर मात्र झोपत उडाली. अन्नावरची वासनाही गेली. एकुलतं एक मूल प्रथमच आपल्यापासून दूर जाण्यातलं वास्तव जाणवू लागलं, पण काय करणार होते? तिची प्रगती तर रोखू शकणार नव्हते, स्वत:च्या स्वार्थासाठी.

अशाच मनोवस्थेत तिचे बाबा, मी आणि जयती तिघांनीही राजस्थानात मंुबईपासून ९१० किमी अंतरावरचं कोटा गाठलं. दोन दिवस थांबून तिची हॉस्टेलची, क्लासेसची सोय लावली आणि मंुबईला माघारी परतलो. या सगळ्या घडामोडींना चार महिने होऊन गेलेत. परवा मी तिला भेटायला गेलो होते. पहाटे चारपासून ते रात्री साडेदहा पर्यंत तिचं वेळापत्रक ठरलेलं. ज्या दिवशी गेलो त्या दिवशी सकाळी थोडा वेळ भेट झाली. नंतर ती क्लासला निघून गेली. स्वत:ची खोली तिने चांगली ठेवली होती. फ्रेश होऊन मी हॉस्टेलच्या तिच्या इतर मैत्रिणींबरोबर नाश्ता करत होते तेव्हा अनेक मुली होमसिक झाल्याचं दिसलं, अनेकींच्या जेवणाविषयी तक्रारी होत्या, काही जणींना इंग्रजी कळत नव्हतं, तर काहींना तिथला अभ्यास जड वाटत होता.

किचनच्या प्रमुख असणाऱ्या आण्टींशी गप्पा झाल्या. 'आपकी लडकी बडी शांत है. खानेपिनेकी भी कोई झिगझिग नही. इसलिए हम लोग उसका ज्यादा खयाल रखते है.' खाली हॉस्टेलच्या रेक्टर भेटल्या 'अरे आप जयती की मम्मी हो ना? आप बहुत भाग्यशाली हो. ऐसी लडकी आपने पाई है.' दुपारी थोड्या वेळासाठी जयती हॉस्टेलवर आली. आम्ही गप्पा मारल्या. हसलो खिदळलो. चारच्या ट्रेनला ती मला सोडायला कोटा स्टेशनवर आली. रिक्षात आम्ही दंगामस्ती करत होतो. स्टेशनवर गाडी आल्यावर सगळं सामान गाडीत लावून दिलं आणि माझ्या गालाचा पापा घेत म्हणाली, 'आई तू न रडता खूप वेगवेगळी कामं मंुबईत करतेयस, अशीच करत राहा, पुढे जा. तू मोठी झालेलं मला पाहायचंय.' माझ्या डोळ्यात पाणी आलं, तिला म्हणाले, 'हो, छकुली, तुझ्याविषयीही तिथल्या मंडळींकडून ऐकल्यावर मला छान वाटलं. तेव्हा मी चटकन म्हणाली, 'आई, तूच तर मला हे सगळं दिलं आहेस, आता तुझं लक्ष फक्त तुझ्या करिअरकडेच असलं पाहिजे, माझ्याकडे नाही. 'आय एम ग्रोन अप नाऊ, अॅण्ड आय अॅम प्राउड दॅट यु आर अल्सो ग्रोइंग अप. किप इट अप ममा,' तेवढ्यात रेल्वेची शिट्टी ऐकू आली आणि धावत जाऊन मी डब्यात चढले. मोठ्या आनंदाने आणि समाधानाने!