परिचय-पत्र

वृत्तनिवेदक, सूत्रसंचालक, मुलाखतकार म्हणून ज्योती अंबेकर महाराष्ट्राला सुपरिचित आहेत. त्यांचा जन्म १८ ऑगस्ट १९६७ रोजी परंडा (जिल्हा उस्मानाबाद) येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण लातूर येथील देशिकेंद्र विद्यालय आणि दयानंद महाविद्यालय येथे झाला. बी. कॉम. पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी डॉ. बाबासाहेब मराठवाडा विद्यापीठ (औरंगाबाद) येथे पत्रकारिता अभ्यासक्रमातील पदवी (बी.जे.) मिळविली. केंद्र सरकारच्या भारतीय सेवेतील (आयआयएस्) अधिकारी आहेत. दूरदर्शनच्या मुंबई केंद्रावर वृत्तसंपादक आहेत.

औरंगाबादेत (दैनिक लोकमत) आणि गोव्यात (दैनिक गोमंतक) वृत्तपत्रात नोकरी आणि नंतर भारत सरकारचा माहिती व नभोवाणी मंत्रालयात निवडीनंतर पुणे आणि मुंबई येथे पत्र सूचना कार्यालय (पीआयबी) असा त्यांचा प्रवास त्यांना मुंबईत दूरदर्शन केंद्रात घेऊन आला. दूरदर्शनच्या मुंबई केंद्रात वृत्तसंपादक म्हणून काम केल्यानंतर त्या काही काळ केंद्र सरकारच्या प्रकाशन विभागाच्या महाराष्ट्र विभागाच्या प्रमुख म्हणून तसेच ‘योजना’ मासिकाचे संपादक म्हणून त्यांनी काम केले.

नेहमीच प्रसन्न आणि हसतमुख असणाऱ्या ज्योती अंबेकर यांचे व्यक्तिमत्व लोभसवाणे आहे. आपल्या संवाद कौशल्याच्या बळावर त्यांनी आतापर्यंत शेकडो जाहीर कार्यक्रमांचे सूत्र संचालन केले आहे. गेल्या १५ वर्षातील सर्व मुखमंत्री, उपमुख्यमंत्री, शास्त्रज्ञ, संपादक, वकील, डॉक्टर्स, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी अशा बहुतेक सर्व क्षेत्रातील मोठमोठ्या व्यक्तींच्या त्यांनी जाहीर ‘लाईव्ह’ मुलाखती घेतल्या आहेत. अगदी सहजपणे पण स्वतः कमी बोलत मुलाखतकर्त्याकडून लोकांना आवश्यक असलेली उपयुक्त माहिती काढून घेण्याच्या त्यांच्या कौशल्याबद्दल त्या वाखाणल्या जातात.

सह्याद्री वाहिनीवर त्या गेल्या १२-१३ वर्षे बातम्या देत आहे. संयतपणे प्रेक्षकांना समजेल अशारीतिने त्या बातम्या वाचतात. त्यात कोठेही कृत्रिमता किंवा नाटकीपणा नसतो, म्हणूनच त्यांचे वृत्तनिवेदन लोकांना आवडते. बातम्या वाचणे, कार्यक्रमांचे सूत्रसंचालन करणे, मुलाखती घेणे हा त्यांचा छंद किंवा आवडीचा भाग आहे. मुळात मराठवाड्यातील ग्रामीण भागातून येऊन त्यांनी ‘आवाजा’ च्या क्षेत्रात केवळ मुंबईतच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात स्वतःचे स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. आपल्यातील अंगभूत गुणांना चांगले वळण देऊन आपल्याला पाहिजे त्या गोष्टी साध्य करता येतात, याचे ज्योती अंबेकर या उत्तम उदाहरण आहेत. दूरदर्शनमध्ये सहज म्हणून वृत्तनिवेदकासाठी अर्ज केला आणि त्यांची लेखी परीक्षा, मुलाखत, स्क्रीन टेस्ट अशा रीतसर प्रक्रियेनंतर बारा हजार जणांमधून प्रथम क्रमांकाने निवड झाली. बोलण्याचे आपले कौशल्य अधिक धारदार करण्यासाठी आवाज जोपासना शास्त्राचा अखेरचा शब्द म्हणून ओळखले जाणारे डॉ. अशोक रानडे यांचाकडे ज्योती अंबेकर यांनी शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतले. या प्रशिक्षणच्या शिदोरीवर आणि त्याआधारे भरपूर मेहनत घेउन त्यांनी स्वतःला घडविले आणि ‘निवेदन, सूत्रसंचालन आणि मुलाखत’ या संवाद-कलेच्या प्रांतात त्या एक मानदंड ठरल्या.

आपल्याकडील माहिती आणि निरीक्षण पोहचविण्याकरिता ज्योती अंबेकर यांनी ‘संवाद-कला’ ही कार्यशाळा घेण्यास सुरवात केली आहे. आतापर्यंत मुंबई, औरंगाबाद आणि सोलापूर येथे त्यांनी या कार्यशाळा घेतल्या आहेत.

‘सुख-संवाद’ हा प्रेक्षकांशी त्यांचा जिव्हाळ्याच्या विषयावर जाहीर संवाद साधण्याचा त्यांचा अनोखा उपक्रम आहे. तो तीन प्रकारांमध्ये होतो. एक केवळ महिलांसाठी- ‘आहे तुजपाशीच’, दुसरा केवळ युवक – युवतींसाठी- ‘हे दिवस फुलायचे’ आणि तिसरा केवळ जेष्ठ नागरिकांसाठी- ‘तुम्ही आम्हाला हवे आहात.’ या इंटरॅक्टिव कार्यक्रमात त्या आरोग्य, आहार, कौटुंबिक सौहार्द, मानसिक शांतता आणि व्यवस्थापन या विषयाचा अनुषंगाने सहभागी प्रेक्षकवर्गाशी मनमोकळा संवाद साधतात. त्यासाठी त्या-त्या क्षेत्रातील मान्यवरांना बोलावून त्यांच्याशी गप्पा मारतात. आपल्या मानतील प्रश्नांची उकल करण्यासाठी मदत व्हावी आणि जगण्याच्या व्यावहाराकडे पाहणाचा दृष्टीकोन अधिक सकारात्मक व्हावा हा या कार्यक्रमामागचा हेतू आहे.


पुरस्कार

  • 'मराठवाडा लोकविकास मंच' तर्फे मराठवाडा गौरव पुरस्कार - हस्ते श्री बापूसाहेब काळदाते, प्रमुख पाहुणे उद्योगपती श्री राहुल बजाज, तत्कालीन मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख (२००५)
  • कै. सौ. कुसुमताई शंकरराव चव्हाण स्मृती महिला पुरस्कार २००७ - हस्ते श्री. बाळासाहेब विखे पाटील, तत्कालीन उद्योग सांस्कृतिक मंत्री अशोक चव्हाण तसेच महाराष्ट्र टाईम्स चे तत्कालीन संपादक भारतकुमार राऊत
  • प्रज्ञा पुरस्कार २००७ - हस्ते तत्कालीन मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख आणि तत्कालीन केंद्रीय मंत्री सुशीलकुमारजी शिंदे, अध्यक्ष नटश्रेष्ठ प्रभाकरपंत पणशीकर
  • श्री. विलासरावजी देशमुख शिक्षण प्रसारक व बहुउद्देशीय संस्था, बुलडाणा यांचा राज्यस्तरीय सावित्री पुरस्कार २०१२ - हस्ते मंत्री श्री हर्षवर्धन पाटील, प्रमुख पाहुणे श्री उल्हास पवार