अमृतबोला १ (६-डिसेंबर-२०१३)

मुळात बोलणं ही अनैसर्गिक क्रिया आहे. म्हणजे ती जन्मत:च आपण घेऊन येत नाही. त्यामुळे ती प्रयत्नपूर्वक शिकावी आणि शिकवावी लागते. काहींना त्यांच्यातल्या उपजत गुणांमुळे चांगलं बोलता येतं, काहींना अनुकरण करीत प्रयत्नानं शिकावं लागतं. जसं काही थोड्या नशिबवान मंडळींना जन्मत:च सुरांचं ज्ञान असतं. बोलण्याचं तसंच आहे. निसर्गत: आपल्याला सुखकारक वाटणारी अवस्था म्हणजे आडवं झोपून राहाणं. तोंड उघडून बोलणं – ओरडणंसुद्धा- कृत्रिम कृती आहे. ती शिकणं हे सर्वांसाठीचं महत्वाचं आहे, नव्हे,ती शिकण्याची प्रक्रियासुद्धा आनंददायक आहे. चांगलं बोलणं म्हणजे काय याबद्दल अनेक गैरसमज आहेत. केवळ स्पष्ट बोलता आलं म्हणजे झालं, असं नव्हे! छापील बोलता येणं म्हणजेही छान बोलणं नव्हे! अखंड बोलता येणं म्हणजेही चांगलं बोलता येणं नव्हे! तुम्हाला जे सांगायचं आहे ते प्रभावीपणे (म्हणजे पुन्हा जोरजोरात हातवारे करून नव्हे,तर अपेक्षित परिणाम साधणारे) तुमच्या स्वत:च्या आवाजात मांडता आलं म्हणजे पुरे! थोडक्यात- स्पष्ट, प्रवाही, नादमधूर-ऐकावंसं वाटावं असं बोलता आलं पाहिजे.