‘ग्लॅमर’ चे दार सहज उघडणांऱ्या ज्योती अंबेकर

श्रमिक एकजूट | दिवाळी 2010 | चंद्रकला कुलकर्णी नांदेड

‘अंतरिचा दिवा’ या माझ्या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ संपला आणि मी घरी आले. शेजारच्या सूर्यवंशी काकू, सुनेसह भेटायला आल्या.

‘छान झाला म्हणे कार्यक्रम. ज्योती अंबेकर कार्यक्रमाला होत्या म्हणे. त्या दूरदर्शनवाल्या ज्योती अंबेकर का?

“हो त्याच”

“मग काय कार्यक्रम चांगला होणारच. मुद्दाम मुंबईहून कार्यक्रमाला येणं ही लहान गोष्ट नाही, बरं चंद्रकला तुझं नशीबच चांगलं.”

मी हो म्हणाले, आणि मनात म्हणाले, आपली ज्योती ही आता ग्ल्यामर असलेली व्यक्ती झाली बरं का! सह्याद्री वाहिनीवरची वृत्तनिवेदिका म्हणून ज्योती अंबेकर प्रसिद्ध असल्या तरी त्या वृत्तसंपादक व वृत्तनिवेदक असणाऱ्या अपवादात्मक अधिकारी आहेत. हे कमी जणांना माहिती आहे. उत्कृष्ट अँकरिंग, सुत्रसंचालन यामुळे महाराष्ट्रात प्रसिद्ध, त्यात भर म्हणून विविध निमित्ताने गांवोगावी त्यांचे गाजलेले कार्यक्रम, त्यांना लाभणारा महिलांचा वाढता प्रतिसाद, स्वःतच्या खात्या अंतर्गत त्यांनी घेतलेले व गाजलेले उपक्रम सर्वांना माहित आहे. चित्रपट, नाट्यव इतर कलाक्षेत्रातील नामवंत कलाकार यांचा निकट सहवास नेहमीच त्यांना लाभतो. यासोबत अनेक उच्चपदस्थ व्यक्तीसोबत व मुलाखतीत त्यांचा सहज व प्रसन्न वावर या साऱ्यातून ज्योती भोवती स्वतःच असं तेजोवलय निर्माण होता गेलं. पण त्यांच्या या आजच्या झळाळत्या रूपाच्या आड मला मात्र दिसते, एक साधी , मराठवाड्यात लातूरमध्ये जन्मलेली शिकालेली मध्यमवर्गीय मुलगी. घरकाम, नातीगोती , स्वयंपाक , कौटुंबिक व्याप, ताण ही तारेवरची कसरत करीत सरकन पुढे गेलेली एक महत्वाकांक्षी मुलगी.

आज ज्योतीने मराठवाड्यातच नव्हे तर महाराष्ट्रात उज्वल स्थान मिळवले आहे. एरवी अगदी चारचौघी सारखी दिसणारी आणि वावरणारी ज्योती, परंतु बातम्या देत असताना तिच्याकडे पण चेहऱ्यावरचे स्मितहास्य , टापटीपीचा वैशिठयपूर्ण पोशाख आणि मुख्य म्हणजे तो नादमय आवाज ऐकतच रहावा असा तो तिने कष्टाने कमावला आहे. त्या आवाजाला साजेशी समर्पक , चपखल शब्दफेक हे सारे सहज साध्य झालेलं नाही. यासाठी तिने अविरत कष्ट घेतलेले आहेत. वृत्तानिवेदिकेचं काम तिला अव्हानासारखं वाटत होत. जर्नालिझमची पदवी तिने उत्तमरितीने मिळवली होती.दूरदर्शनच्या निवड चाचणीतही उत्तम यश मिळालं होतं. पण वृत्तानिवेदिकेचे काम मिळत नव्हते. पण आता माघार नाही हे तिने ठरवल होतं. मग सुरु झाले तिचे अविरत परिश्रम, आवाजातले चढ – उतार व इतर अनुषंगिक गोष्टींचा अभ्यास, त्याचे धडे गिरवायला सुरुवात केली. रोज कित्येक कि.मी. जाऊन डॉ. अशोक रानडे यांच्या सारख्या तज्ञाचे मार्गदर्शन घेतले. रांत्रदिवस प्रॅक्टीस केली आणि शेवटी तिने यश मिळवलेच. ज्योतीला पहिल्यांदा दूरदर्शनवर बातम्या देताना पाहिलं आणि आम्हा सर्वांची माने अभिमानाने भरून आली. डोळेही , आमच्यातल्याच एका साध्या मुलीने एक अजब गोष्ट केली होती. पैसा , एखाद्या गॉडफादरचे आशिर्वाद, कौटुंबिक पार्श्वभूमी , व्याक्तीत्वाच्या रूढ कल्पना , या कशाचेही पाठबळ नसताना भल्या भल्यांना झुलवणारे ‘ग्लॅमरचे’ दार जिद्द आणि परीश्रमाच्या जोरावर तिने उघडून दाखवले.

मुख्य म्हणजे या प्रत्येक कामात तिचे पती अजय अंबेकरांची साथ मिळाली. अन जे मिळवले ते तिला पुरेसे वाटलं नाही. अजून पुढे जायचं असेल तर अजून शिकलं पाहिजे , परीक्षा दिल्या पाहिजेत असा ध्यास तिच्या मनाने घेतला. त्यासाठी तिने पुन्हा अभ्यास अभ्यास सुरु केला. खात्याअंतर्गत परीक्षा दिल्या. ट्रेनिंग घेतले. आज ती केंद्र सरकारच्या पीआयबीमध्ये उच्च पदावर कार्यरत आहे. यासोबतच मुलाखतीचे तंत्र तिने विकसित केले. हेलीकॉपटरमध्ये मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची मुलाखत तिने घेतली तेंव्हा तिचे प्रशन विचारण्याचे कौशल्य पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले. आज अंबेकर म्याडम आपल्या खात्यात एक उच्चपदस्थ कर्तबगार व प्रयोगशील अधिकारी म्हणून प्रसिद्ध आहेत. पण आपल्या कौटुंबिक जबाबदार्यांही त्यांनी यशस्वीपणे सांभाळल्या आहेत. कुटुंबासाठी आवश्यक तेवढा वेळ दिलाच पाहिजे असे त्यांचे मत आहे आणि त्याप्रमाणे त्या वागताताही. त्यांचे पती अजय अंबेकर हे स्वतः उच्च अधिकारी पदावर आहेत. अजय ज्योती हे दांपत्य मला एक आदर्श दांपत्य वाटते. स्वतःचे व्यक्तीमत्व फुलवत पती-पत्नीत संपूर्ण एकरूपता कशी असावी याचे उदाहरण त्यांनी घालून दिले आहे. एकाच अपत्याला जन्म द्यायचा हे त्यांचे धोरण. ते त्यांनी पाळलं. जयतीचा जन्म हे त्यांच्या आयुष्याच सार्थक. तिला वाढवताना त्यांनी जास्तीत जास्त तिच्या मनाचा विचार केला , पण फाजील लाड केले नाहीत. घरातलीही कामं तिला शिकवली. स्वावलंबी बनवले. आय.आय.टी. च्या तयारीसाठी जयती कोटा इथे जाण्यासाठी निघाली , तेंव्हा ज्योतीच्या अंतःकरणातला आईच्या ममतेचा कोपरा हुरहुळला. तेंव्हा जयती म्हणाली , ”आई तू माझ्याकडे किती लक्ष देणार? मी काही नेहमीच तुझ्याजवळ राहणार नाही. हळवी होऊ नको, तू तुझ्या करिअरकडे लक्ष दे.”

आज ज्योती अंबेकर अनेक ठिकाणी जाऊन कार्यक्रमचं संचलन करतात. अगदी अमेरिकेत सुद्धा. त्यांच बोलणं ऐकण्यासाठी लोक गर्दी करतात. लोकानां त्यांचे लाघवी व अतिशय समर्पक बोलणे खुपच आवडते. सासर नांदेड आणि माहेर लातूर. मराठवाडा मागासलेला आहे अस मानलं जात, पण या मातीतही प्रतीभासंपन्न माणसं आहेत हे ज्योती अंबेकरानी सिद्ध केलंय. मराठवाड्याच्या मुलींमध्ये प्रतिभा आहे. त्यांनी संधी मिळवाव्यात व आलेल्या संधीच सोनं कराव असं त्यांना वाटतं.

सासूवर आईसारखी माया हे ज्योतीच्या स्वभावाचे वैशिष्टय ‘मदर्स डे’ च्या दिवशी ज्योतीचा ‘माझी आई’ हा लेख प्रकाशित झाला तेंव्हा आम्हाला वाटलं तो लेख आईवर असेल. पण प्रत्यक्षात तो लेख त्यांच्या सासूवर म्हणजे माईवर होता. आईवर लिहाव तसंच त्यांनी आपल्या सासुबद्दल लिहील होतं, माईनाही ज्योतीबद्दल अपार माया , कौतुक आहे. आपल्या मुलाची – सुनेची भेट झाली की, त्यांचे डोळे आनंदाश्रूंनी भरून जातात.

आपल्या आई-वडिलांनाबद्दलही ज्योतीला खूप अभिमान आहे. त्यांच्या संस्कारामुळे मी अशी घडले असे त्या म्हणतात. आई-वडिलांचे आशीर्वाद व प्रोत्साहन त्यांचा मुलांच्या प्रगतीत मोलाचा वाटा आहे असे त्या म्हणतात.

अक्षरशः शून्यातून स्वतःचे व्यक्तीमत्व व सामाजिक स्थान निर्माण करणाऱ्या ज्योती अंबेकर या नव्या पिढीच्या मुलींसाठी एक ‘रोल मॉडेल’ ठरत आहेत. असे मला वाटते.

संस्कृतमध्ये ‘देहालीदीपन्याय’ नावाने एक उदाहरण दिले जाते. उंबरठ्यावर ठेवलेला दिवा हा आतल्या आणि बाहेरच्या अशा दोन्ही खोल्यानां उजेड देतो. कर्तबगार मुलगी ही अशी ‘देहीलीदीपासारखी’ असते. माहेर आणि सासर उजळून टाकते.

कन्यारत्न झाले, मनातून जीव लावा. माहेर सासर दोन्ही घरी लावते वंशाचा दिवा. भावी वाटचालिंसाठी ज्योतीला शुभेच्छा.